• Sun. Jan 25th, 2026

आगरकर मळा, काटवण खंडोबा रोड, बोहरी चाळ व गवळीवाडा येथील दूषित पाण्याचा प्रश्‍न गंभीर

ByMirror

Jan 24, 2026

दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी उपाययोजनांची मागणी


नवनिर्वाचित नगरसेवकांचा पुढाकार; मनपा पाणीपुरवठा विभागाला निवेदन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहराच्या प्रभाग क्रमांक 15 मधील आगरकर मळा, काटवण खंडोबा रोड, बोहरी चाळ व गवळीवाडा परिसरात गेल्या एक वर्षापासून सुरू असलेल्या दूषित पाण्याच्या गंभीर समस्येबाबत नवनिर्वाचित नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे.


नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारा हा प्रश्‍न तात्काळ सोडविण्यात यावा, यासाठी नगरसेविका गीतांजली काळे, पौर्णिमा गव्हाळ, नगरसेवक दत्ता गाडळकर व सुजय मोहिते यांच्या वतीने पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी परिमल निकम यांना निवेदन देण्यात आले. संबंधित भागातील पाणीपुरवठा यंत्रणेची तातडीने तपासणी करून दूषित पाणीपुरवठा थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.


प्रभागातील आगरकर मळा, काटवण खंडोबा रोड, बोहरी चाळ व गवळीवाडा या भागात नळाद्वारे मैलामिश्रीत व दुर्गंधीयुक्त पाणी मागील एक वर्षापासून येत आहे. परिणामी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवनिर्वाचित नगरसेवकांनी प्रभागातील प्रलंबित नागरी समस्या सोडविण्यास प्राधान्य देत दूषित पाण्याचा प्रश्‍न तात्काळ मार्गी लावावा, अशी भूमिका घेतली आहे. यावेळी नगरसेवक दत्ता गाडळकर, सुजय मोहिते, सुनिल काळे, विजय गव्हाळे व जितू गंभीर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *