79 किलो गटात पटकाविले विजेतेपद; महाराष्ट्र केसरीसाठी निवड
अंतिम कुस्तीत प्रतिस्पर्ध्याला चितपट
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पिंपळगाव वाघा (ता. नगर) येथील युवा कुस्तीपटू पै. सौरभ पोपट शिंदे याने आपल्या कुस्ती खेळातील कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन करुन महाराष्ट्र केसरी कुस्ती निवड चाचणी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. टाकळी कडेवळी (ता. श्रीगोंदा) येथे पार पडलेल्या या निवड चाचणीत 79 किलो वजन गटातील माती विभागात पै. सौरभ शिंदे याने प्रेक्षणीय कुस्त्यांचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांना चितपट केले. या दमदार कामगिरीच्या जोरावर त्याने प्रथम क्रमांक पटकावत थेट महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.
या स्पर्धेत पै. सौरभ शिंदे याने सलग चारही कुस्त्या अत्यंत आत्मविश्वासाने व उत्कृष्ट डावपेचांनी खेळल्या. प्रत्येक कुस्तीत त्याची ताकद, पकड, चपळता आणि डावपेच स्पष्टपणे दिसून आले. विशेषतः अंतिम फेरीतील कुस्ती ही स्पर्धेचा केंद्रबिंदू ठरली. या निर्णायक कुस्तीत त्याने योग्य संधी साधली आणि अचूक डाव टाकत प्रतिस्पर्धी मल्लाला आसमान दाखवले. प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या गजरात त्याने विजय साकारत प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले. या यशासह पै. सौरभ शिंदे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 79 किलो वजन गटात अहिल्यानगर जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे.
पै. सौरभ शिंदे हे नामांकित पैलवान पै. पोपट शिंदे यांचे सुपुत्र असून त्यांना कुस्तीचे बाळकडू घरातूनच मिळाले आहे. सध्या ते गुरु हनुमान कुस्ती संकुल, अंबिलवाडी येथे पै. दशरथ गव्हाणे व पै. सखाराम गव्हाणे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. या निवडीबद्दल पै. मिलिंद जपे, पै. अशोक घोडके, पै. बाळासाहेब भापकर, पै. युवराज करंजुळे, पै. नाना डोंगरे, पै. अजय अजबे यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील अनेक नामवंत मल्ल, प्रशिक्षक व कुस्तीप्रेमींनी पै. सौरभ शिंदे यांचे अभिनंदन करून महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
