युवा सेनेतर्फे मूकबधिर विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप
स्व. ठाकरे यांच्या विचारांचा वारसा सामाजिक कार्यातून पुढे जात आहे – योगेश गलांडे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- युवा सेनेच्या वतीने शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची शंभरावी जयंती सामाजिक उपक्रमातून साजरी करण्यात आली. भिस्तबाग, सावेडी येथील अपंग संजीवनी सोसायटी संचलित मूकबधिर विद्यालय व वसतीगृहातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले.
युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन जाधव उपस्थित होते. यावेळी भिंगारचे माजी नगरसेवक सुनील लालबोंद्रे, अभिषेक भोसले, शंकर शेळके, भिंगार नगरसेवक संजय छजलानी, भिंगारचे माजी नगरसेवक रविंद्र लालबोंद्रे, तसेच स्वप्नील खराडे, प्रदीप दहातोंडे, अजिनाथ शिरसाठ, जितेंद्र तळेकर, वसीम शेख, किसन तरटे, दीपक परभाने, शशिकांत संसारे, नामदेव झेंडे, रामनाथ घुगे, गोविंद रासकोंडा, सागर पवार, वैष्णव गलांडे, स्वप्नील भरड, अरबाज खान, गौरव पाटोळे, विशाल गीते, तेजस क्षीरसागर, महेश त्र्यंबके, महेश थोरवे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या सामाजिक विचारांना कृतीतून अभिवादन करण्याचा हा उपक्रम असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे म्हणाले की, शिवसेनेची नेहमीच वंचित, उपेक्षित घटकांना न्याय व आधार देण्याची भूमिका राहिली आहे. दिव्यांग विद्यार्थी हे देखील समाजाचा महत्त्वाचा घटक असून, त्यांच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा सामाजिक कार्यातून पुढे नेण्याचे काम शिवसेना करत आहे. या विद्यार्थ्यांना केवळ मदतीचीच नव्हे, तर प्रेम, आपुलकी आणि आत्मविश्वास देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन जाधव म्हणाले की, स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व देत आयुष्यभर कार्य केले. त्यांच्याच विचारांच्या प्रेरणेतून शिवसेना शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. वंचित, उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिवसेना सातत्याने प्रयत्नशील आहे. अशा उपक्रमांतूनच बाळासाहेबांचा खरा वारसा जपला जात आहे. असल्याचे त्यांनी सांगितले.
