शालेय आठवणींना उजाळा देत गुरुशिष्य नात्याचे झाले पुनर्मिलन
माजी विद्यार्थी शिवाजी वेताळ यांच्या सामाजिक कार्याचा गौरव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मिरी (ता. पाथर्डी) येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज हायस्कूलमधील सन 1983 च्या इयत्ता दहावी (एसएससी) बॅचचा स्नेहमेळावा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तब्बल 43 वर्षांनंतर एकत्र आलेल्या वर्ग मित्र-मैत्रिणींनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत जुन्या दिवसांत पुन्हा एकदा रमून गेले.
या स्नेहमेळाव्यानिमित्ताने शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा शिस्तप्रिय वचक, क्रीडा स्पर्धांतील सहभाग, वर्गात मिळालेल्या शिक्षांचा किस्से, स्नेहसंमेलनातील गोड क्षण अशा अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला. अनेक वर्षांनंतर भेटलेल्या मित्रमैत्रिणींनी एकमेकांशी मनमुराद गप्पा मारत हसत-खेळत जुन्या आठवणी ताज्या केल्या. आयुष्य घडविणाऱ्या आपल्या माजी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आदरांजली अर्पण केली.
राज्याच्या विविध भागांतून माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भणगे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून शेटे सर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुंचे विधिवत पूजन करून त्यांचा सन्मान केला. गुरुजींनीही आपल्या विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या जीवनप्रवासाविषयी जाणून घेतले. त्या क्षणी जणू पुन्हा एकदा वर्गच भरविल्याचा अनुभव उपस्थितांना आला.
या स्नेहमेळाव्यात मेजर शिवाजी वेताळ, गिरधारी डहाळे, संतोष गुगळे, सुधाकर बोरूडे, शिवाजी आगळे, बाबासाहेब कोकाटे, संतोष आंबेकर, दीपक ओटी, अशोक गवळी, संगिता मेहेर, नंदा ऊरणकर, मंदा सानप, रावसाहेब कोकाटे, लता मेहर आदी माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. सर्वांनी आपल्या भावना व्यक्त करत चांगल्यावाईट आठवणींचा पट उलगडला, ज्यामुळे संपूर्ण वातावरण भावनांनी भारावून गेले.
यावेळी मेजर शिवाजी वेताळ यांनी गेल्या 27 वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात कार्य करत गरजू घटकांना आरोग्य सुविधा पुरविल्या असून मागील पाच वर्षांपासून गोशाळा चालवत सामाजिक कार्यात योगदान दिल्याबद्दल सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक शिवाजी आगळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर बोरुडे यांनी केले. आभार शिवाजी वेताळ यांनी मानले.
