स्वयंअर्थसहाय्यित संस्थांतील संस्थात्मक पद्धतींवर केले संशोधन
अध्यापक वर्गाच्या कार्यक्षमतेसाठी मार्गदर्शक ठरणारा शोधनिबंध
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील सौ. शिल्पा बक्षी-राजपूत यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, यांच्या वतीने विद्यावाचस्पती (पी.एच.डी.) ही मानाची पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी “अहिल्यानगर जिल्ह्यातील स्वयंअर्थसहाय्यित संस्थांमधील संस्थात्मक पद्धती व त्यांचा अध्यापक वर्गाच्या कार्यपद्धतीवर होणारा परिणाम : एक विश्लेषणात्मक अभ्यास” या महत्त्वपूर्ण विषयावर संशोधन प्रबंध सादर केला आहे.
आजच्या शिक्षणव्यवस्थेत स्वयंअर्थसहाय्यित संस्थांची भूमिका अधिक व्यापक होत असताना, अशा संस्थांमधील व्यवस्थापन पद्धती, प्रशासन, कार्यसंस्कृती व त्याचा थेट परिणाम अध्यापकांच्या कामकाजावर कसा होतो, याचे सखोल व वस्तुनिष्ठ विश्लेषण या संशोधनातून करण्यात आले आहे. त्यामुळे हा शोधनिबंध स्वयंअर्थसहाय्यित संस्थांचे संचालक, प्रशासक तसेच अध्यापक वर्गासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
शिल्पा बक्षी-राजपूत या शहरातील सुप्रसिद्ध उद्योजक रविंद्र (रविराज) बक्षी यांच्या कन्या असून, त्यांनी शिक्षण क्षेत्रातील संशोधनात विशेष रुची घेऊन हा अभ्यास पूर्ण केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध स्वयंअर्थसहाय्यित संस्थांचा प्रत्यक्ष अभ्यास, माहिती संकलन व विश्लेषण करून त्यांनी हा संशोधन प्रबंध सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास सादर केला होता. त्यांच्या अभ्यासाची शैक्षणिक उपयुक्तता व दर्जा लक्षात घेऊन विद्यापीठाने त्यांना पी.एच.डी. पदवी प्रदान केली आहे.
त्यांचे संशोधन केंद्र आयएमएस सीडी अँड आर महाविद्यालय (IMSCD&R), अहिल्यानगर हे होते. या संशोधनासाठी त्यांना वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. हातिम एफ. कयूमी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या संशोधनामुळे शिक्षण व्यवस्थापन क्षेत्रात नव्या दृष्टीकोनाची भर पडली आहे.
शिल्पा बक्षी-राजपूत यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध संस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन होत आहे.
