• Sun. Jan 11th, 2026

मुकुंदनगरमध्ये महाविकास आघाडीचे शक्तीप्रदर्शन

ByMirror

Jan 10, 2026

मोटारसायकल रॅलीने रोड शो; धार्मिक सलोख्याचा संदेश देत प्रचार


दमबारा हजारी व शहा शरीफ दर्ग्यावर चादर अर्पण

अहिल्यानगर- महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रभाग क्रमांक 4 मधील मुकुंदनगर परिसरात मोटारसायकल रॅलीद्वारे रोड शो करण्यात आला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि खासदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या प्रचार रॅलीत युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


मोटारसायकल रॅलीची सुरुवात मुकुंदनगर येथील दमबारा हजारी व शहा शरीफ दर्ग्यावर चादर अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर दुचाकी वाहनांवरून प्रचार रॅली काढण्यात आली. या प्रचार रॅलीत कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त घोषणांनी वातावरण दणाणून गेले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सपकाळ व खासदार लंके यांनी रॅलीत सहभाग घेत मतदारांना आवाहन केले.


महाविकास आघाडीचे नेतृत्व हे जनतेच्या प्रश्‍नांना न्याय देणारे, संविधानाप्रमाणे समता, न्याय व बंधुता हे मुल्य जोपासणारे आहे. सर्वसामान्यांच्या हिताचे आणि विकासाभिमुख असल्याचे यावेळी नेत्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.


प्रभाग क्रमांक 4 मधील काँग्रेस पक्षाचे उमेदवार शेख नसीम खान साहेब (अ), शेख फैयाज अजिजोद्दीन (ब), खान मिनाज जाफर (क) व शम्स हाजी समीर खान (ड) यांच्या प्रचारासाठी या मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी संधी देण्याचे आवाहन केले. या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष दीप चव्हाण, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष निलेश मालपाणी, माजी नगरसेवक संजय झिंजे, युवक काँग्रेसचे मोसिम शेख यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *