• Tue. Dec 30th, 2025

युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे यांचा पत्रकार परिषदेत आरोप

ByMirror

Dec 30, 2025

पूर्वनियोजित कट रचून जिवे मारण्याचा प्रयत्न

एमआयडीसीत गुन्हेगारी टोळीची दहशत; कठोर कारवाईसाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन


एमआयडीसीतील गुंडगिरी व दहशत हद्दपार करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असून त्याचाच एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चिरंजीव दत्तात्रय गाढवे व आकाश उर्फ चिट्ट्या बबन दंडवते यांनी संगनमताने माझा व माझ्या कुटुंबाचा जिवे मारण्याचा पूर्वनियोजित कट रचला असून, शनिवारी जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा गंभीर आरोप स्वराज्य कामगार संघटनेचे सचिव तसेच युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे यांनी सोमवारी (दि.29 डिसेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.


यासंदर्भात सोमवारी (दि. 29 डिसेंबर) जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार निवेदन देण्यात आले असून, पोलीस प्रशासन गांभीर्याने दखल घेत नसल्याने गुंडशाही वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. एमआयडीसीतील गुंडगिरी व दहशत हद्दपार करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.


योगेश गलांडे हे एमआयडीसी परिसरात स्वराज्य कामगार संघटनेचे सचिव तसेच युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असून, कामगारांचे प्रश्‍न, अडचणी आणि सामाजिक कार्यासाठी ते सातत्याने सक्रिय आहेत. याच कार्याचा राग धरून चिरंजीव गाढवे याने माझ्यावर हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.


दि. 27 डिसेंबर रोजी सकाळी सनफार्मा चौकात बिगर नंबरच्या निळ्या रंगाच्या बलीनो कारने गलांडे यांच्या फॉर्च्युनर वाहनाला अडवण्यात आले. बंदूक व कोयत्याच्या जोरावर जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या वाहनाची काच व बोनेटचे नुकसान झाले. प्रसंगावधान राखत गाडी पळवून थेट एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठल्यामुळे जीव वाचल्याचे गलांडे यांनी सांगितले. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.


यानंतर, दंडवते बंधू चालवत असलेल्या एमआयडीसीतील हॉटेल ब्लिस येथे गेल्या 10 ते 12 दिवसांपासून गलांडे व त्यांच्या कुटुंबाच्या जिवे मारण्याचा कट शिजत असल्याची माहिती एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर दिल्याचे गलांडे यांनी सांगितले. दंडवते विरोधात सुरू असलेली कोर्टातील केस मागे घ्यावी, यासाठी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.


या संपूर्ण कटाचा पर्दाफाश करण्यासाठी हॉटेल ब्लिस येथील सीसीटीव्ही फुटेज तसेच चिरंजीव गाढवे व आकाश दंडवते यांचे मागील 15 दिवसांचे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR/SDR) तपासण्याची मागणी त्यांनी केली. आपल्यावर खोट्या खंडणी व चोरीच्या गुन्ह्यांत गोवण्यात आल्याचा आरोपही गलांडे यांनी केला. चोरीच्या प्रकरणात पोलीस प्रशासनाने ‘ब समरी’ मंजूर केल्याने खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे स्पष्ट झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून काम सुरू असून, हे काम थांबवण्यासाठीच आपल्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.


एमआयडीसी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक उद्योजक भयभीत असल्याने तक्रार करण्यास पुढे येत नसल्याचे गलांडे यांनी सांगितले. एका कंपनीत कच्चा माल रोखण्याचे काम देखील आकाश उर्फ चिट्ट्या बबन दंडवते याने केल्याचा प्रकार घडला असून, याप्रकरणी कंपनी प्रशासनाच्या वतीने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.


वैयक्तिक वादातून दुसऱ्या व्यक्तीला पुढे करून हल्ले केले जात असून दर तीन ते चार महिन्यांनी जीवघेण्या हल्ल्याचे प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला होता. मात्र पोलीस प्रशासन कठोर कारवाई करत नसल्याने गुंडांची दहशत वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला.


या गुन्हेगारी टोळ्यांच्या मागे कोण गॉडफादर आहे, याचाही शोध घेणे गरजेचे असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून चिरंजीव गाढवे, दंडवते बंधू व त्यांच्या गुन्हेगारी टोळक्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी योगेश गलांडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *