• Tue. Dec 30th, 2025

‘पेन्शनर डे’ सोहळ्यात 75 वर्षे पूर्ण केलेल्या 23 सेवानिवृत्त शिक्षकांचा गौरव

ByMirror

Dec 24, 2025

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांवर सखोल चर्चा


सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रश्‍न विधानसभेत मांडण्याची आमदार पाचपुते यांच्याकडे मागणी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षण क्षेत्रात आयुष्यभर ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या सन्मानार्थ श्रीगोंदा तालुका पेन्शनर असोसिएशनच्या वतीने ‘पेन्शनर डे’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात 75 वर्षे पूर्ण केलेल्या 23 माजी शिक्षकांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमातून ज्येष्ठ शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.


मुख्य सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार बबनराव पाचपुते यांनी उपस्थित राहून शिक्षकांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून श्रीगोंदा तालुका पेन्शनर असोसिएशनचे अध्यक्ष गजानन ढवळे तर गटविकास अधिकारी राणी खराटे विशेष उपस्थित होत्या.
सरचिटणीस बाळासाहेब साबळे यांनी प्रास्ताविकातून संघटनेच्या वाटचालीचा सविस्तर आढावा घेतला. संघटनेच्या स्थापनेपासून आजपर्यंत शिक्षकांच्या न्यायहक्कासाठी केलेल्या लढ्याचा उल्लेख करत, पेन्शनधारक शिक्षकांच्या प्रश्‍नांसाठी संघटना सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.


कार्यक्रमादरम्यान सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रलंबित प्रश्‍न, पेन्शनविषयक अडचणी, वैद्यकीय सुविधा, महागाई भत्ता तसेच जीवनमान यासंदर्भात सखोल चर्चा झाली. यावेळी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस बन्सी उबाळे यांनी शिक्षकांचे प्रश्‍न आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेत मांडावेत, अशी मागणी करण्यात आली. शिक्षकांनी आयुष्यभर समाजासाठी दिलेल्या सेवेला न्याय मिळावा, यासाठी शासनाने अधिक संवेदनशील भूमिका घ्यावी, असेही मत यावेळी व्यक्त करण्यात आले.


सकाळी 9 ते 11 या वेळेत महाजन देवा यांच्या हस्ते होम-हवन व विधीवत पूजा करण्यात आली. या धार्मिक कार्यक्रमातून ज्येष्ठ शिक्षकांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली. कार्यक्रमात रज्जाक शेख यांनी सादर केलेल्या पोवाड्याने उपस्थितांची मने जिंकली. या पोवाड्यातून संघटनेच्या कार्याचा, शिक्षकांच्या हक्कांसाठी दिलेल्या संघर्षाचा आणि शिक्षण क्षेत्रातील लढ्याचा इतिहास प्रभावीपणे मांडण्यात आला.


या सोहळ्यानिमित्त उपस्थित सर्व शिक्षकांसाठी माणिक हराळ यांच्या वतीने स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या शेवटी अनिल भदागरे यांनी आभार मानले. यावेळी अशोक गायकवाड, गंगाराम गावडे, माजी जि. प. सदस्य अनिल ठवाळ, नगरसेवक सुशीलकुमार शिंदे, गुनवरे काका, सिताराम भुजबळ, दिगंबर जगताप, अर्जुन दळवी, रामदास भापकर, बबनराव कुलट, मोहनराव पवार, पांडुरंग दरेकर, पारनेर अध्यक्ष बागल, लक्ष्मण क्षीरसागर, विठ्ठलराव जठार, लक्ष्मण घोडके, बाळासाहेब लगड, गोपाळा ससाने, गुलाबराव मांगडे, चंद्रकांत धुमाळ, पोपटराव घोडके, भगवान शिंदे यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने माजी व सेवानिवृत्त शिक्षक, तसेच महिला शिक्षिका उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *