• Tue. Dec 30th, 2025

जागतिक ध्यान दिनानिमित्त आनंदधाम येथे आत्मध्यान शिबिरास साधकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ByMirror

Dec 23, 2025

ध्यान, आत्मशुद्धी, संयम, अहिंसा व जीवनातील समतोलावर डॉ. श्री शिवमुनीजी महाराजांचे मार्गदर्शन


ध्यान म्हणजे स्वतःला ओळखण्याची प्रक्रिया -श्री शिवमुनीजी महाराज

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील आनंदधाम येथे वर्धमान स्थानिक जैन श्रावक संघाच्या वतीने जागतिक ध्यान दिनाचे औचित्य साधून आत्मध्यान लाईव्ह शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ध्यान गुरु आचार्य सम्राट परमपूज्य डॉ. श्री शिवमुनीजी महाराज यांनी लाईव्ह माध्यमातून उपस्थित साधकांना मार्गदर्शन केले. या उपक्रमास नागरिक, महिला, युवक-युवती तसेच विद्यार्थी वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


या कार्यक्रमास युवाचार्य प्रवर पूज्य श्री महेंद्रऋषीजी महाराज, महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य श्री कुंदनऋषीजी महाराज, प्रबुद्ध विचारवंत पूज्य श्री आदर्श ऋषीजी महाराज, तसेच श्रमण संघीय सल्लागार पूज्य श्री तारकऋषीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत वाढत चाललेला ताणतणाव, अस्वस्थता, नैराश्‍य, मानसिक अशांतता दूर करून अंतःकरणात शांती, संयम व सकारात्मक विचारांची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने या आत्मध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ध्यानाच्या माध्यमातून मानसिक स्थैर्य, आत्मिक उन्नती व जीवनातील संतुलन साधण्यावर विशेष भर देण्यात आला.


आचार्य सम्राट परमपूज्य डॉ. श्री शिवमुनीजी महाराज यांनी लार्इव्ह कार्यक्रमाद्वारे ध्यान, आत्मशुद्धी, संयम, अहिंसा व जीवनातील समतोल यावर मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थित साधकांना ध्यानाच्या विविध पद्धती समजावून सांगत अंतर्मनाशी संवाद साधण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, आजचा माणूस बाह्य प्रगतीच्या शर्यतीत इतका गुंतला आहे की, त्याने स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद साधणेच विसरला आहे. भौतिक सुखसंपत्ती वाढत असताना अंतःशांती मात्र हरवत चालली आहे. अशा परिस्थितीत ध्यान हे केवळ धार्मिक साधना न राहता जीवन जगण्याची अत्यावश्‍यक कला बनली आहे. ध्यानामुळे मन स्थिर होते, विचार शुद्ध होतात आणि आत्मचिंतनाची दिशा मिळते. जेव्हा मन शांत होते, तेव्हाच जीवनातील योग्य निर्णय घेता येतात. ध्यान म्हणजे स्वतःला ओळखण्याची प्रक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले.


कार्यक्रमात सामूहिक ध्यान सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रातून सहभागी साधकांना मानसिक शांतता, सकारात्मक विचारशक्ती, आत्मिक समाधान आणि अंतःशांतीचा अनुभव घेतला. ध्यानासोबतच योगाचे धडे देत आरोग्य, एकाग्रता व निर्णयक्षमता कशी वाढवता येते यावरही मार्गदर्शन करण्यात आले.


कार्यक्रमानंतर जय गुरु आनंद भक्त मंडळाच्या वतीने प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तिलोकरत्न धार्मिक परीक्षा बोर्ड, वर्धमान स्थानिक जैन श्रावक संघ, विनायक नगर जैन श्रावक संघ तसेच आनंद कटारिया, रमेश गुंदेचा, पारस गुंदेचा, बाबुशेठ लोढा, सुरेश मुनोत, सचिन भळगट यांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *