जागतिक ध्यान दिनाचा उपक्रम
नागरिक व साधकांना सहभागी होण्याचे आवाहन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मानव जीवनात वाढत चाललेला ताणतणाव, अस्वस्थता, नैराश्य आणि मानसिक अशांतता दूर करून अंतःकरणात शांती, संयम व सकारात्मकतेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने जागतिक ध्यान दिनानिमित्त शहरातील आनंदधाम येथे रविवारी (दि.21 डिसेंबर) आत्मध्यान लाईव्ह शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात सर्व नागरिक व साधकांना सहभागी होण्याचे आवाहन वर्धमान स्था. जैन श्रावक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
रविवारी सकाळी 9.00 ते दुपारी 12.00 या वेळेत ध्यान गुरु आचार्य सम्राट परमपूज्य डॉ. श्री शिवमुनीजी म.सा. यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार असून, यामध्ये जैन धर्मातील प्रख्यात संत-महात्मे व साधु-साध्वीवृंदांचे पावन सान्निध्य लाभणार आहे. या पवित्र कार्यक्रमास युवाचार्य प्रवर पूज्य श्री महेंद्रऋषीजी म.सा., महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य श्री कुंदनऋषीजी म.सा., प्रबुद्ध विचारवंत पूज्य श्री आदर्श ऋषीजी म.सा., तसेच श्रमण संघीय सल्लागार पूज्य श्री तारकऋषीजी म.सा. यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्या प्रेरणादायी विचारांमधून ध्यान, आत्मशुद्धी, संयम, अहिंसा व जीवनातील संतुलन यावर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत माणूस बाह्य प्रगतीकडे धाव घेत असताना अंतर्गत शांती हरवत चालला आहे. अशा परिस्थितीत ध्यान हे केवळ साधना नसून जीवन जगण्याची कला बनली आहे. या कार्यक्रमात सामूहिक ध्यान सत्राच्या माध्यमातून सहभागी साधकांना मानसिक स्थैर्य, आत्मिक उन्नती, सकारात्मक विचारशक्ती व अंतर्मनातील शांतीचा अनुभव घेता येणार आहे. तसेच ध्यानाबरोबर योगाचे देखील धडे दिले जाणार असून या अभ्यासातून आरोग्य, एकाग्रता व जीवनातील निर्णयक्षमता कशी वृद्धिंगत होते यावरही मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या ध्यान महोत्सवात विविध स्तरांतील नागरिक, युवक, विद्यार्थी, व्यावसायिक तसेच महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
