विद्यार्थ्यांनी भाषणातून मांडले बाबासाहेबांचे विचार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका छायाताई काकडे व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका लक्ष्मीताई आहेर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित शिक्षक, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी बाबासाहेबांच्या कार्याच्या स्मरणार्थ पुष्पांजली अर्पण करत अभिवादन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनकार्याविषयी, संविधाननिर्मितीत त्यांच्या योगदानाविषयी तसेच महापरिनिर्वाण दिनाच्या ऐतिहासिक महत्त्वाविषयी प्रभावी भाषणे दिली. यामध्ये मानसी शेलार, श्रीराम भोगाडे, दिक्षा देविदास बनकर, मानसी संतोष शेलार आणि यशस्वी रोकडे या विद्यार्थिनीचा सहभाग होता.
सांस्कृतिक विभाग प्रमुख एस. एम. गारुडकर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक, शैक्षणिक व राष्ट्रनिर्मितीतील भूमिका सविस्तर मांडली. बाबासाहेबांनी दिलेले विचार, तत्त्वज्ञान आणि घटनात्मक मूल्ये पिढ्यांना मार्गदर्शक आहेत, असे त्यांनी सांगितले.
मुख्याध्यापिका छायाताई काकडे यांनी विद्यार्थ्यांना बाबासाहेबांच्या विचारांचा अभ्यास करून ते पुढे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. समता, बंधुता आणि शिक्षणाचा दीप पेटवत राहणे हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली आहे, असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप पालवे यांनी केले. आभार विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक महादेव भद्रे यांनी मानले.
