वेदिका नर्सिंग कॉलेज व समाज परिवर्तन संस्थेचा उपक्रम; एड्स जनजागृती सप्ताहाचा समारोप
बाबासाहेबांचे कार्य म्हणजे समानतेचा दीपस्तंभ -डॉ. भास्कर रणनवरे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पाईपलाईन रोडवरील वेदिका नर्सिंग कॉलेज आणि समाज परिवर्तन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन करण्यात आले.
या सोहळ्यासोबतच जागतिक एड्स जनजागृती सप्ताहाचा समारोप विविध उपक्रमांनी पार पडला. कार्यक्रमास समाज परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष डॉ. भास्कर रणनवरे, वेदिका नर्सिंग कॉलेजच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. दर्शना धोंडे (बारवकर), प्राचार्या आशा गायकवाड-आहेर, उपप्राचार्या लता कांबळे, तसेच नर्सिंगचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
डॉ. भास्कर रणनवरे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य संपूर्ण भारतातील सर्व जाती-धर्मांच्या जनतेसाठी पथदर्शक आहे. शिक्षणाचा अधिकार, संपत्तीचा अधिकार, नोकरीच्या संधी, सामाजिक सुरक्षा हे सर्व अधिकार बहुजन समाजाला प्रदान करणारे ते क्रांतिकारक नेते होते. स्त्रियांसाठी बाबासाहेबांचे योगदान अफाट आहे. समान वेतन, आठ तासांची कामाची वेळ, प्रसूती रजा, वैद्यकीय रजा, पेन्शन, घटस्फोटाचा अधिकार, दत्तक घेण्याचा व देण्याचा अधिकार, संपत्तीतील समान हिस्सा हे सर्व अधिकार संविधानाद्वारे मिळवून देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजेच बाबासाहेब. तसेच शेतीसाठी सिंचन योजना, मोठी धरणे, विद्युतपुरवठा प्रकल्प, भाकरा नांगल आणि ब्रह्मपुत्रा नदीवरील धरण प्रकल्प यांचाही उल्लेख करून त्यांनी बाबासाहेबांच्या राष्ट्रनिर्मितीतील बहुआयामी योगदानावर प्रकाश टाकला.
प्रास्ताविक प्राचार्या आशा गायकवाड यांनी केले.जागतिक एड्स जनजागृती सप्ताहानिमित्त वेदिका नर्सिंग कॉलेजच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. दर्शना धोंडे यांनी एड्सविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी एड्सची कारणे संसर्ग टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, संसर्ग झाल्यास घ्यावयाची काळजी व एड्सग्रस्त रुग्णांप्रती भेदभाव न करता सहानुभूतीने वागण्याचे महत्त्व सांगितले.
यानंतर नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी एड्सवरील पथनाट्य सादर करत जनजागृतीचा प्रभावी संदेश दिला. पथनाट्यातून एड्सविषयी माहिती, प्रतिबंधक उपाय आणि सामाजिक जबाबदारी विषद करण्यात आली. प्रास्ताविक प्राचार्या आशा गायकवाड यांनी केले. आभार उपप्राचार्या लता कांबळे यांनी मानले.
