राज्यात सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेली शाळा म्हणून नाईट हायस्कूलचा मान
सर्वाधिक विद्यार्थी प्रवेशित करणाऱ्यांचा पुरस्काराने गौरव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षण प्रसार व जनजागृती अभियानांतर्गत शिक्षणापासून वंचित अर्धवट शिक्षण राहिलेल्या घरच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे, वारंवार नापास झाल्यामुळे, विवाह लवकर झाल्यामुळे वय वाढल्याने पुन्हा नियमित शाळेत जाऊन शकलेल्या, शिक्षणापासून दुरावलेल्या आणि अर्धवट शिक्षण सोडलेल्या गरजवंतांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा उपक्रम भाई सथ्था नाईट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने राबविला.
हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.चे शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे, मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी जुबेर पठाण, पेमराज सारडा ज्युनिअर कॉलेजचे चेअरमन डॉ. पारस कोठारी, नाईट हायस्कूलच्या चेअरमन ज्योतीताई कुलकर्णी, ज्येष्ठ मार्गदर्शक अजितशेठ बोरा, शाळा समिती सदस्य विलास बडवे, प्राचार्य सुनील सुसरे, स्नेहालय संस्थेच्या उषा खोलम, संजय साठे, कविता मरकड आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर अभियान स्पर्धात्मकरीत्या राबविण्यात आले. शिक्षक, शिक्षकेतर गटात प्रथम- अशोक शिंदे, द्वितीय- शरद पवार, तृतीय- कैलास करांडे, विद्यार्थी गटामध्ये प्रथम- स्नेहल विधाटे व माई खरे, द्वितीय- ज्योती पगारे, तृतीय- शुभम पाचारणे व बबीता पाटोळे, वर्गशिक्षक गटामध्ये प्रथम- संदेश पिपाडा, द्वितीय- अमोल कदम व शिवप्रसाद शिंदे, तृतीय- शरद पवार यांनी क्रमांक मिळवले. ‘शिक्षणदूत’ या विशेष अभियानांतर्गत 2024-25 या शैक्षणिक वर्षात झालेल्या शोध मोहिमेत विद्यार्थ्यांनी 96 आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 126 अशा एकूण 222 शाळाबाह्य विद्यार्थ्यांना प्रवेशित केले. या उपक्रमांमुळे शाळेतील विद्यार्थी संख्या 600 पेक्षा अधिक झाली असून, राज्यात सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेली नाईट शाळा म्हणून भाई सथ्था नाईट हायस्कूलचा मान उंचावला आहे.
प्रास्ताविकात बोलताना डॉ. पारस कोठारी म्हणाले की, शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाचा प्रचार-प्रसार आवश्यक आहे. यासाठी शिक्षणदूत संकल्पना पुढे आली. यातून अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात जोडले गेले. सर्वांपर्यंत शिक्षण पोहचावे व समाजातील होतकरु वर्गाला याचा लाभ मिळण्यासाठी संस्थेचा प्रयत्न आहे. यासाठी संस्थेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले. पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य सुनील सुसरे यांनी केले.
विद्यार्थिनी कविता मरकडने हृदयस्पर्शी प्रेरणादायी अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या की, 16 व्या वर्षी माझे लग्न झाले. घरात शिक्षक, उच्चशिक्षित असूनही माझे शिक्षण थांबले. पोलीस दलात जाण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. नाईट हायस्कूलमुळे मला शिक्षणाची संधी मिळाली. आज मी लॉ शिक्षण पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. खाकी वर्दी नाही मिळाली तरी वकील होण्याचा मानस व्यक्त केला आणि तो मला माझ्या माहेरकडूनच मिळणार असल्याचे सांगितले.
जुबेर पठाण म्हणाले की, शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत घेऊन जाण्याचे कार्य भाई सथ्था नाईट हायस्कूल करत आहे. यासाठी शिक्षक, विद्यार्थी देखील योगदान देत आहे. आज नियमित शाळेत विद्यार्थी मिळवण्यासाठी धडपड होत असताना, नाईट हायस्कूलमध्ये मोठ्या संख्येने अर्धवट शिक्षण सोडलेले विद्यार्थी प्रेवेशित केले. येथे शिक्षण घेत असलेले विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, आपुलकी व मायेचा भाव जाणवत असल्याचे ते म्हणाले.
बाळासाहेब बुगे म्हणाले की, समाजात फिल्डवर गेल्यानंतर प्रश्न समजतात. भाई सथ्था नाईट हायस्कूलने प्रत्यक्ष फिल्डवर काम करुन गरजूंना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. वय वर्ष 14 च्या पुढील अर्धवट शिक्षण सोडलेले विद्यार्थी शोधून शाळेत आणणे मोठी कामगिरी आहे. राज्यात प्रथमच असा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. श्रमप्रतिष्ठा सांभाळून नाईट हायस्कूलचे विद्यार्थी शिक्षण घेत आहे. समाजात नैतिक धाक संपत चालला असून, त्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. रात्रशाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करुन त्यांच्या जीवनाला दिशा देत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्योती कुलकर्णी यांनी प्रवेशित विद्यार्थ्यांचे व पुरस्कारप्राप्त विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
शिरीष मोडक म्हणाले की, शाळाबाह्य विद्यार्थी पुन्हा प्रवेशित करणे अत्यंत अवघड काम आहे. अशा विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. राज्यात सर्वाधिक विद्यार्थी संख्या व गुणवत्तेत देखील आघाडीवर असण्याचा बहुमान या शाळेला मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
या यशस्वी उपक्रमातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करून त्यांना ट्रॉफी, सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विलास बडवे यांच्यावतीने रोख बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद पवार यांनी केले. आभार अमोल कदम यांनी मानले. यावेळी शालेय शिक्षक गजेंद्र गाडगीळ, महादेव राऊत,अमोल कदम, शिवप्रसाद शिंदे,उज्वला साठे, बाळू गोरडे, संदेश पिपाडा, मंगेश भुते, शरद पवार, कैलास करांडे, प्रशांत शिंदे, अशोक शिंदे, स्वाती होले, अनिरुद्ध देशमुख, अनिरुद्ध कुलकर्णी, अनुराधा दरेकर, वृषाली साताळकर, वैशाली दुराफे, अविनाश गवळी, मनोज कोंडेजकर, कैलास बालटे आदींसह रात्रशाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अभियान अंतर्गत स्पर्धेत सहभाग घेऊन शिक्षण प्रसार करून नगर शहराचा शैक्षणिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व शिक्षणदूतांचे संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. रमेश झरकर, मानद सचिव संजय जोशी, जेष्ठ मार्गदर्शक ब्रिजलाल सारडा, माजी कार्याध्यक्ष अनंत फडणीस यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
