रस्त्यांची दुरावस्था, ड्रेनेज लाईन आणि पाणी प्रश्न गंभीर
केडगाव जागरूक मंचच्या वतीने आयुक्तांना निवेदन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव एकनाथ नगर परिसरातील राधाकृष्ण कॉलनी येथील रस्त्यांची दुरावस्था, ब्लॉक ड्रेनेज लाईन आणि अत्यल्प दाबाचा पाणीपुरवठा या समस्यांनी स्थानिक नागरिक अक्षरशः हैराण झाले असून, या गंभीर प्रश्नांची तातडीने दखल घेण्यासाठी केडगाव जागरूक मंच यांच्या वतीने मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देण्यात आले.
मंचाचे अध्यक्ष विशाल पाचारणे यांनी मनपा आयुक्त डांगे यांची भेट घेऊन नागरिकांच्या वतीने प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे. अर्चना हॉटेल ते कांदा मार्केट या मुख्य रस्त्याला लागून असलेल्या राधाकृष्ण कॉलनीतील अंतर्गत रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून धोकादायक बनला आहे. या रस्त्याने लहान मुले, महिला व वृद्ध व्यक्तींना चालणे अवघड झाले असून लहान-मोठे अपघात घडत असल्याचे मंचतर्फे सांगण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
पूर्वी टाकण्यात आलेली ड्रेनेज लाईन पूर्णतः ब्लॉक झाल्याने सांडपाण्याचा मुद्दा बिकट झाला आहे. दुर्गंधी, अस्वच्छता आणि पाणी साचण्याच्या समस्येमुळे आरोग्य धोक्यात येत असल्याचे नागरिकांनी निवेदनात नमूद केले आहे. ड्रेनेज लाईनची तात्काळ दुरुस्ती किंवा आवश्यक असल्यास नवीन लाईन टाकावी, अशी मागणी करण्यात आली. सदर भागात पाणीपुरवठा अत्यल्प दाबाने होत असून अनेकदा चार ते पाच दिवसांनीच पाणी मिळते, असा आरोप करण्यात आला आहे. परंतु अनेक तक्रारी करूनही उपाययोजना न झाल्याने लोकांमध्ये संताप वाढला आहे. रस्ते, ड्रेनेज व पाणीपुरवठा या तिन्ही समस्या गंभीर असल्याने प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करण्याचे म्हंटले आहे. प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा केडगाव जागरूक मंचाने दिला आहे.
