कचरा वेचकांच्या मुलांच्या मेट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचा प्रस्ताव रखडला
कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतकडून समाज कल्याण मंत्री व विभागाकडे तक्रार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कचरा वेचकांच्या पाल्यांना मिळणाऱ्या संयुक्त मेट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना प्रस्तावांच्या प्रक्रियेत होत असलेल्या विलंबाबाबत कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतकडून समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट तसेच समाज कल्याण निरीक्षक यांच्याकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास उडाणशिवे यांनी या गंभीर प्रश्नाकडे समाज कल्याण विभागाचे लक्ष वेधले.
अहिल्यानगर शहरात सुका कचरा संकलनावर उदरनिर्वाह करणारा मोठा समाजवर्ग आहे. तुटपुंज्या उत्पन्नातून दैनंदिन खर्च भागवताना या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होते आणि त्यातून निरक्षरतेचे प्रमाण वाढले. या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र सरकारने संयुक्तपणे सुरू केलेल्या मेट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेत कचरा वेचकांच्या पाल्यांचा समावेश करून हजारो कुटुंबांना शैक्षणिक दिलासा दिला आहे.
परंतु, काही तांत्रिक कागदपत्रांच्या अटींमुळे अहिल्यानगरमधील अनेक पात्र कचरा वेचक कुटुंबांना अद्याप या योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही. हा प्रश्न गांभीर्याने लक्षात घेऊन कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतने शिष्यवृत्ती प्रस्तावांची पूर्तता केली. दि. 22 एप्रिल 2025 रोजी पंचायतने संपूर्ण माहिती, विद्यार्थ्यांची यादी, वर्गनिहाय तपशील तसेच कचरा वेचक म्हणून काम करत असल्याची प्रमाणपत्रे जोडून प्रस्ताव सीताराम सारडा विद्यालयाला सुपूर्द केला. इतकी सर्व माहिती उपलब्ध करूनही शाळेकडून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात होत असलेला विलंब चिंताजनक असल्याचे पंचायतने निवेदनात म्हटले आहे.
प्रस्ताव वेळेत शासनाकडे पोहोचला नाही, तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही आणि त्यासाठी संबंधित शाळा प्रशासनच जबाबदार राहील, असा इशाराही पंचायतने दिला आहे. त्यामुळे शाळेला तातडीने प्रस्ताव दाखल करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती समाज कल्याण विभागास करण्यात आली आहे. तसेच, शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे होणारे नुकसान शाळा प्रशासनाकडून वसूल करावे, अशी मागणीही संघटनेकडून करण्यात आली आहे.
