हर हर महादेव… च्या घोषात हजारो भाविकांची उपस्थिती
भगवान प्रत्येकाला सेवेची संधी देतो -आमदार संग्राम जगताप
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हर हर महादेव… जय शिव शंकर… बम बम भोले… अशा गजराने सोमवारी (दि. 13 ऑक्टोबर) रात्री श्री बेलेश्वर महादेव मंदिर परिसर दुमदुमून गेला. ढोल, झांज, डमरू यांच्या गजरात, फुलांच्या सुगंधात आणि दिव्य प्रकाशात बेलेश्वर महादेव मंदिरातील भगवान शंकराच्या पिंडसाठी चांदीचा मुकुट अर्पण सोहळा धार्मिक वातावरणात रंगला होता.
या देवस्थानात पहिल्यांदाच चांदीचा मुकुट अर्पण करण्यात आला. या प्रसंगी श्री बेलेश्वर महादेवाच्या पिंडीवर चांदीचा तेजस्वी मुकुट सजविण्यात आला होता, त्या धार्मिक दृश्याने उपस्थित हजारो भाविक मंत्रमुग्ध झाले.
सोमवारी सायंकाळी स्टेट बँक चौकातून चांदीच्या मुकुटाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या बैलगाडीत मुकुटाचे दर्शन ठेवण्यात आले. भक्तीगीतांच्या तालावर नाचत, भोलेनाथ की जय! म्हणत भाविकांनी उत्साहाने मिरवणुकीत सहभाग घेतला. यामध्ये महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्याचे आयोजन लक्ष्मण (आबा) कचरे, संतोष कानडे, गणेश लालबागे, संदीप गुजर, तसेच श्री बेलेश्वर आरती ग्रुप व आदिशक्ती सार्वजनिक मित्र मंडळ यांनी केले होते. त्यांच्या अथक परिश्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता.
या सोहळ्याला आमदार संग्राम जगताप यांनी भेट देत भाविकांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, बेलेश्वर मंदिर हे वर्षानुवर्षे नगरकरांचे श्रद्धास्थान राहिले आहे. मोठा भक्त परिवार या मंदिराशी जोडला गेलेला आहे. येथे अनेक सुधारणा भाविक भक्तांनी केल्या. श्रावण महिन्यात मोठ्या संख्येने भाविक दर्शनात येत असतात. भाविकांना अडचण झाली नाही पाहिजे, यासाठी सर्व सेवा देत आहेत. भगवान प्रत्येकाला सेवेची संधी देत असतो, ही जबाबदारी सर्वांनी घ्यावी.
अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या काळात मंदिरांचे जीर्णोद्धार केले. आता शहर व नाव जिल्ह्याचे नाव बदललेले असून, सर्वत्र धार्मिक भावना वाढीस लागल्या असल्याचे ते म्हणाले.
रात्री महाआरतीच्या वेळी संपूर्ण मंदिर परिसर मंत्रोच्चारांनी दुमदुमला. दीपांच्या उजेडात भगवान शंकराची आरती होताच भाविकांनी जयघोष केला. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी चांदीचा मुकुट बनवणारे कारागीर बजरंग काशिनाथ गुरव तसेच सोहळ्याचे प्रमुख संयोजक यांचा आमदार जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या धार्मिक सोहळ्याला शहरातील आजी-माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते. सोहळा यशस्वी होण्यासाठी अतुल जाधव व सर्व मित्रपरिवार, नातेवाईक आणि आप्तेष्टांनी परिश्रम घेतले.