सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पदवी प्रदान समारंभात गौरव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 126 व्या पदवी प्रदान समारंभात एल.एल.बी. मध्ये सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल अहिल्यानगर मधील कोमल काकासाहेब खेसे-देशमुख हिला सन्मानित करण्यात आले. खेसे हिने एल.एल.बी च्या अंतिम वर्षात शिकत असताना सव्हिल प्रोसिजर कोड विषयात हे यश प्राप्त केले.
पुणे येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या पदवी प्रदान समारंभात कार्यकारी समिती अध्यक्ष राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदचे प्रा. डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते कोमल खेसे हिचा सन्मान झाला. यावेळी कुलगुरू प्रा.डॉ. सुरेश गोसावी, प्र. कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे, प्रभारी संचालक प्रा. डॉ. प्रभाकर देसाई आदी उपस्थित होते.
जवळे-कडलग (ता. संगमनेर) येथील असलेल्या कोमल खेसे हिने नामदेवराव परजणे पाटील विधी महाविद्यालय, कोपरगाव येथे एलएलबी तृतीय वर्षाच्या परीक्षेत सिव्हिल प्रोसिजर कोड या अत्यंत क्लिष्ट विषयात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे.
कोमलने कुटुंबाची जबाबदारी आणि शिकण्याची जिद्द उराशी बाळगून हे यश मिळवले आहे. तिची ही कामगिरी केवळ कुटुंबासाठीच नव्हे, तर कठोर परिश्रमाने मोठी स्वप्ने पाहणाऱ्या प्रत्येकासाठी एक प्रेरणास्रोत ठरली आहे. याबद्दल अहिल्यानगरचे राजेंद्र कर्डिले, काकासाहेब खेसे सरदार, प्रा. राहुल देशमुख, प्रा. रवी सातपुते, महेश घावटे, माजी नगरसेवक महेश तवले, जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याध्यक्ष योगिता कर्डिले, प्रा. बाबासाहेब खांदवे, मधुकर लांडगे यांनी तिचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. या यशाबद्दल तिचे जिल्हाभर कौतुक होत आहे.