विविध गटातील संघाची आघाडी
आर्मी पब्लिक स्कूलच्या श्रेया कावरे हिने केले तब्बल 7 गोल
नगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शनिवारी (दि.30 ऑगस्ट) झालेल्या सामन्यात 14 वर्ष वयोगटात आर्मी पब्लिक स्कूल, कैसर एज्युकेशन, आठरे पाटील स्कूल, तर 12 वर्ष वयोगटात ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूलचे संघ विजयी ठरले. 17 वर्षा खालील मुलींच्या गटात आर्मी पब्लिक स्कूलने विजय संपादन केले. यामध्ये श्रेया कावरे हिने उत्कृष्ट खेळ करुन तब्बल 7 गोल केले होते.

14 वर्ष वयोगटात (मुले) आर्मी पब्लिक स्कूल विरुध्द अशोकभाऊ फिरोदिया स्कूलमध्ये सामना रंगला होता. आर्मी पब्लिक स्कूलने आक्रमक खेळी करुन 6 गोल केले. यामध्ये प्रथमेश लहाडे याने 3, आशिष शेळके याने 2 व शंतनू याने 1 गोल केला. प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करता आला नाही. 6-0 गोलने आर्मी पब्लिक स्कूलचा संघ विजयी ठरला.
कैसर एज्युकेशन स्कूल विरुध्द डॉन बॉस्को स्कूलमध्ये अटातटीचा सामना रंगला होता. यामध्ये वेदांत भांडेकर याने 1 गोल करुन 1-0 गोलने कैसर एज्युकेशन स्कूलला विजय मिळवून दिला.
त्याचप्रमाणे तक्षिला स्कूल विरुध्द आठरे पाटील स्कूलमध्ये झालेल्या सामन्यात आठरे पाटील संघाने 3-1 गोलने विजय संपादन केले. आठरे पाटील कडून साई खतोडे याने 2 व ओम गलांडे याने 1 गोल केला. तक्षिला स्कूल कडून शौर्य मोरे याने 1 गोल केला.
17 वर्षा खालील मुलींच्या गटात आर्मी पब्लिक स्कूल विरुध्द डॉन बॉस्को स्कूल मध्ये झालेल्या सामन्यात आर्मी पब्लिक स्कूलच्या संघाने 10-0 गोलने वर्चस्व दाखवित एकहाती विजय मिळवला. श्रेया कावरे हिने तब्बल 7 गोल केले. तर आरती हिने 2 व श्रेया पवार हिने 1 गोल केला. प्रतिस्पर्धी संघाला आर्मी पब्लिक स्कूलच्या आक्रमक खेळापुढे एकही गोल करता आला नाही.
12 वर्ष वयोगटात (मुले) द आयकॉन पब्लिक स्कूल विरुध्द ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झालेल्या सामन्यात 0-1 गोलने ऑक्झिलियम कॉन्व्हेंटचा संघ विजयी झाला. यामध्ये वेदांत बांगर याने 1 गोल करुन संघाला विजय मिळवून दिला.
16 वर्ष वयोगटात तक्षिला स्कूल विरुध्द आठरे पाटील स्कूलमध्ये रंगतदार सामना प्रेक्षकांना पहावयास मिळाला. शेवट पर्यंत दोन्ही संघ विजयासाठी झुंजत होते. दोन्ही संघानी 2-2 गोल करुन बरोबरी साधली. शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळी करुन एकमेकांना गोल करु दिला नाही. हा सामना बरोबरीत सुटला. यामध्ये तक्षिला स्कूल कडून जस्वीर ग्रोव्हर व आयुष गुंड यांनी प्रत्येकी 1 गोल केला. तर आठरे पाटील स्कूलकडून भानुदास चंद याने 2 गोल केले.