उत्कृष्ट देखावा सादर करणाऱ्या गणेश मंडळांना रोख बक्षिस व पुरस्कार जाहीर
अवयवदान हेच खरे नवजीवनदान -जालिंदर बोरुडे
नगर (प्रतिनिधी)- गणेशोत्सव हा सामाजिक संदेश देण्यासाठी प्रभावी व्यासपीठ असून, नेत्रदान, अवयवदान व देहदान या विषयांवर जनजागृती करण्यासाठी देखावे सादर करण्याचे आवाहन फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
या विषयांवर उत्कृष्ट देखावे सादर करणाऱ्या गणेश मंडळांचा जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या हस्ते विशेष गौरव, रोख बक्षिस व पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी दिली.
सध्या देशात व राज्यात हजारो रुग्ण अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, अवयवदानासंदर्भात अनेक गैरसमजुती समाजात प्रचलित आहेत. फिनिक्स फाउंडेशन या गैरसमजुती दूर करण्याचे कार्य सातत्याने करत आहे. या चळवळीतून आतापर्यंत अनेकांनी नेत्रदान करून अंधांना नवदृष्टी दिली आहे.
गणेशोत्सवात दरवर्षी विविध विषयांवरील देखावे उभारले जातात. परंतु, नेत्रदान, अवयवदान व देहदानाची जागृती होण्यासाठी अधिक ठोस प्रयत्नांची गरज आहे. अवयव कृत्रिमरीत्या तयार होऊ शकत नसल्याने फक्त मरणोत्तर अवयवदानातूनच गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकणार असल्याचे फाऊंडेशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
अवयवदानाने अनेक गरजूंना नवजीवन मिळू शकते. हे कार्य हे केवळ दान नसून, समाजासाठी केलेले महान पुण्यकर्म आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजात मोठ्या प्रमाणावर या संकल्पनेचा प्रचार-प्रसार होण्याची आवश्यकता असल्याची भावना जालिंदर बोरुडे यांनी व्यक्त केली.