अमेरिकेतही गणेशोत्सवाची धूम
नगर (प्रतिनिधी)- भारतीय संस्कृतीचे वैभव परदेशात पोहचविण्याचे कार्य नगरच्या सुपुत्राने केले आहे. अहिल्यानगरचे रहिवासी व अमेरिकेतील नामांकित पीडब्ल्यूसी कंपनीत संचालक पदावर कार्यरत असलेले सीए अभिजीत विधाते यांनी अमेरिकेतील सॅन होजे (कॅलिफोर्निया) येथे गणेशोत्सवानिमित्त गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली. सलग नऊव्या वर्षी त्यांनी हा उपक्रम राबवून परदेशात गणेशभक्तीचा उत्सव साजरा केला आहे.
गणेशोत्सव हा भारतीय संस्कृतीतील श्रद्धा, भक्ती आणि एकात्मतेचा सण. अमेरिकेतही भारतीय समुदाय मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करत असतो. यावर्षी विधाते कुटुंबीयांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आरती, भजन, कीर्तन व सांस्कृतिक उपक्रमांमुळे सॅन होजे परिसरातील भारतीय नागरिक एकत्र येत आहे.
सौ. अंकिता विधाते व कु. अमयरा विधाते यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आकर्षक सजावट केली आहे.
लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण सोहळ्यात उत्साहाने सहभागी झाले आहेत. सीए अभिजीत विधाते हे श्री विशाल गणेश देवस्थान, अहिल्यानगरचे विश्वस्त प्रा. माणिक विधाते यांचे सुपुत्र आहेत. अभिजीत यांना लहानपणापासूनच गणेशभक्तीची प्रेरणा मिळाली असून, तीच परंपरा ते परदेशातही जोपासत आहेत.