• Fri. Aug 29th, 2025

सेवाप्रीतच्या महिलांचा वीर पत्नींच्या आत्मनिर्भरतेसाठी पुढाकार

ByMirror

Aug 28, 2025

उडान प्रकल्पाचा शुभारंभ


उडान प्रकल्पातंर्गत देणार मोफत व्यावसायिक प्रशिक्षण

नगर (प्रतिनिधी)- वीर पत्नींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी आणि त्यांना आर्थिक व सामाजिक बळकटी देण्याच्या उद्देशाने सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनच्या वतीने शहरात उडान प्रकल्पाचा शुभारंभ झाला. देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या जवानांच्या वीर पत्नींना या प्रकल्पातून मोफत विविध व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.


या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील 40 वीर पत्नींची निवड करण्यात आली असून, त्यांना फॅशन डिझाईनिंग, ब्युटी पार्लर व्यवसाय, सौंदर्य प्रसाधन विक्री अशा विविध क्षेत्रांतील प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षणामुळे महिलांना स्वावलंबी होण्याची संधी मिळणार आहे.


या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सेवाप्रीतच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय, प्रकल्प प्रमुख अर्चना खंडेलवाल, अश्‍विनी झरेकर, गीता नय्यर, सारिका मुथा, बबीता जग्गी, वस्तीगृहाच्या अधीक्षक श्रद्धा भोसले, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चंद्रकांत पवार, वीर पत्नी अंबिका पोंदे आदींसह ग्रुपच्या महिला सदस्या व वीर पत्नी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


बबीता जग्गी यांनी वीर पत्नींना आनंदी जीवन जगण्यासाठी लाईव्ह चेंजिंग हॅपिनेस संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी वीर पत्नींचा सन्मान करण्यात आला. या प्रशिक्षणात अश्‍विनी झरेकर व्यावसायिक प्रशिक्षणाबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. हे प्रशिक्षण जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात चालणार आहे.


जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, देशाच्या सुरक्षिततेसाठी आपले पती गमावलेल्या वीर पत्नींचा त्याग समाज कधीही विसरणार नाही. अशा महिलांना आधार देऊन स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी प्रेरित करण्याची जबाबदारी समाजाची आहे. उडान प्रकल्प हे त्या दिशेने उचललेले पाऊल आहे. वीर पत्नींनी यापुढे कोणावरही अवलंबून न राहता स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्याचे त्यांनी आवाहन केले.


अर्चना खंडेलवाल म्हणाल्या की, देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही; मात्र त्यांच्या पत्नींना सबलीकरणाद्वारे समाजात आपले स्थान निर्माण करून देणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्यासागर कोरडे यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन महिलांनी वीर पत्नींसाठी घेतलेला उपक्रम दिशादर्शक असल्याचे स्पष्ट केले.


या उपक्रमासाठी अर्चना कुलकर्णी, लता राजोरिया, ममता मेहरवाल, बबीता खंडेलवाल, रेखा बंब, देवकी खंडेलवाल, ज्योती गांधी, नीता बंब, विद्या धोकरीया, राजश्री खंडेलवाल, सीमा खंडेलवाल, सविता खंडेलवाल, मंजू झालानी, अंजू गुजराती, संतोष झालानी, जया झालानी, अंजली महाजन, राजशाही रजनीस, सोनल लोढा, सुरेखा मुनोत, वंदना गांधी, सोनल जखोटिया, श्रेया खंडेलवाल, शिल्पा शिंगवी, शिल्पा पोरे, सारिका साळवे, राखी कोठारी, पूजा भळगट, नयना भंडारी, नीलम खंडेलवाल, कल्पना खंडेलवाल, मीरा धोकरीया, मंजू खंडेलवाल, डिंपल शर्मा, चंदा गांधी, अनुजा जाधव, चित्रा आदी महिला प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *