तिसऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात होणार सन्मान
नगर (प्रतिनिधी)- स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सुमित्रा सुदेश छजलाने यांना गुणवंत शिक्षिका पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे होणाऱ्या तिसऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते छजलाने यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची माहिती संमेलनाचे संयोजक व ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी दिली.
नागरदेवळे (ता. नगर) येथील सुमित्रा छजलाने या (तेलकुडगाव) कुकाणा (ता. नेवासा) येथील काळेवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. गेल्या 27 वर्षापासून त्या शैक्षणिक कार्यात योगदान देत आहे. सर्वसामान्य घटकातील मुला-मुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे. उपक्रमशील शिक्षिका म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. तसेच त्या एक उत्तम गायिका असून, कला क्षेत्रात त्यांनी आपले नाव उज्वल केले आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना गुणवंत शिक्षिका पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.