• Sat. Aug 30th, 2025

कोल्हार गावात दुर्मिळ कृष्ण वडाची लागवड

ByMirror

Aug 25, 2025

जय हिंद फाउंडेशनचा उपक्रम


कोल्हार राज्यातील सर्वाधिक कृष्ण वड असलेले पहिले गाव म्हणून ओळखले जाणार -शिवाजी पालवे

नगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने दुर्मिळ प्रजातीच्या कृष्ण वडाच्या झाडांची लागवड मोहीम हाती घेण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत कोल्हार (ता. पाथर्डी) येथील कोल्हुबाईचे बिरोबा मंदिर परिसर ते कोल्हुबाई माता गड परिसरात कृष्ण वडाची लागवड करण्यात आली.


या मोहिमेत कृष्ण वडाच्या फांद्या व रोपे यांची लागवड करण्यात आली. उपक्रमादरम्यान महादेव पालवे गुरुजी, उपसरपंच गोरक्ष पालवे, किशोर पालवे, ईश्‍वर पालवे, नामदेव गिते, बबनराव पालवे, विष्णू गिते, अशोक पालवे, सुभाष डमाळे, आकाश डमाळे, जय हिंदचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, महादेव पालवे, भगवान जावळे, नवनाथ डमाळे, चंदू नेटके, रामराव नेटके, भाऊ पालवे, आप्पा गर्जे, चंदू पालवे, संजय पालवे, नामदेव गिते, गहिनीनाथ पालवे, ऋषीकेश डमळे, प्रशांत पालवे, आकाश पालवे, स्वराज पालवे, एकनाथ पालवे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


शिवाजी पालवे म्हणाले की, कृष्ण वड हे झाड अत्यंत दुर्मिळ असून वृक्षतोडीमुळे ही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कोल्हार येथे 50 कृष्ण वड लावण्यात आले असून, त्यामुळे कोल्हार हे राज्यातील सर्वाधिक कृष्ण वड असलेले पहिले गाव म्हणून ओळखले जाणार आहे. या झाडामुळे गावात शुद्ध ऑक्सिजन उपलब्ध होऊन ग्रामस्थांचे आरोग्य सुधारण्यास देखील मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


कृष्ण वडाच्या झाडाला धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. भगवान श्रीकृष्ण यांनी लोणी खाण्यासाठी या झाडाची पाने वापरली होती. या पानाचा आकार द्रोणासारखा असल्याने याचे नाव कृष्णवड ठेवले गेले. या झाडाची फळे पक्ष्यांच्या आहारासाठी उपयुक्त असून, हा वृक्ष पक्ष्यांना सुरक्षित निवारा देखील उपलब्ध करून देत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


जय हिंद फाउंडेशनने राबविलेल्या या उपक्रमाचे कोल्हार ग्रामपंचायत व कोल्हुबाई माता देवस्थान कमिटीच्या वतीने कौतुक करण्यात आले. ग्रामस्थांनीही या झाडांची देखभाल करून गावाचे पर्यावरण हिरवेगार ठेवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *