भिंगार मध्ये युगांश महिला बचत गटाची स्थापना
महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नगर (प्रतिनिधी)- भिंगार मध्ये स्त्री सखी महिला मंडळ युगांश आणि ज्ञानेश्वरी महिला बचत गटातर्फे श्रावणी शुक्रवार निमित्त हळदीकुंकवाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. महिलांना आर्थिक सक्षम बनविण्याच्या उद्देशाने युगांश महिला स्वयंसहायता बचत गटाची स्थापना करण्यात आली.
महिलांच्या या बचत गटातर्फे वर्षभर अनेक समाज उपयोगी आणि महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असतात. या पार्श्वभूमीवर हा उपक्रम पार पडला. नव्याने स्थापन करण्यात आलेल्या युगांश महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या अध्यक्षपदी जान्हवी मुंगी आणि उपाध्यक्षपदी प्रेरणा धर्माधिकारी यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. आरती जोशी यांनी महिलांना आरोग्य आणि योगासंबंधी माहिती दिली. त्याचबरोबर भाजप महिला आघाडी अध्यक्ष आणि स्त्री सखी महिला मंडळाच्या अध्यक्षा ज्योत्सना मुंगी यांनी बचत गट आणि आर्थिक उलाढाल या महत्त्वाच्या विषयावर सर्व उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमांमध्ये भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल ज्योत्सना मुंगी यांचा संगीता मुळे आणि नलिनी नागपुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुशीला मुळे, संगीता मुळे, रेखा मुळे, नीलिमा धर्माधिकारी यांनी परिश्रम घेतले.