तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नगर (प्रतिनिधी)- शहरातील पत्रकार तथा पत्रकार संघाचे कार्यकारीणी सदस्य अन्सार राजू सय्यद (वय 55, वाबळे कॉलनी, मुकुंदनगर) यांना वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी केल्याने बाबासाहेब बलभीम सानप (दसरे नगर, वसंत टेकडी) याने जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना राज चेंबर्स, कोठला येथे घडली. पत्रकार सय्यद व सानप यांचे या ठिकाणी समोरा समोर ऑफिस आहे.
शनिवारी (दि. 9 ऑगस्ट) दुपारी 12 च्या सुमारास सय्यद यांच्याकडे आलेले गणेश उरमुले हे राज चेंबर्स, कोठला परिसरात लघुशंकेसाठी गेले असता सानप यांनी गणेश उरमुले यांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्यांच्याकडून बळजबरीने ती जागा पाण्याने धुवून घेतली. मारहाण होत असताना पत्रकार सय्यद व त्यांचा मुलगा सोडविण्यासाठी त्या ठिकाणी गेले असता त्यांना देखील सानप याने शिवीगाळ व धक्काबुक्की केली. पत्रकार आहेस तर जास्त हुशारी करतोस का? तुमची लायकी काय आहे हे मला माहित आहे. मी चांगल्या चांगल्यांना कामाला लावले आहे. आता पुढचा नंबर तुझाच आहे, अशी जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सय्यद यांनी दिलेल्या तक्रारीवरुन तोफखाना पोलीस ठाण्यात सानप यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.