• Tue. Jul 1st, 2025

लोकशाहीचा मुखवटा, सत्तेची मक्तेदारी!

ByMirror

Jun 30, 2025

जात, धर्म आणि मतदार अक्कलमारी या त्रिसूत्रीवर आधारित सत्ता


पीपल्स हेल्पलाईनचा आरोप

नगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्यानंतर भारतीय राजकारणात जात, धर्म आणि मतदार अक्कलमारी या त्रिसूत्रीवर आधारित सत्ता राबवली जात असल्याचा आरोप पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने करण्यात आला आहे. ही खरी लोकशाही आहे की सत्ताधाऱ्यांच्या हितासाठी उभी राहिलेली सत्तामोहक राजतंत्रीय व्यवस्था? हा भारतीय लोकशाहीच्या वाटचालीत एक गंभीर प्रश्‍न उभा राहिला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


राजकीय महत्वाकांक्षा ही केवळ जनसेवा न राहता, हिंदुत्वाचा अलेक्झांडर होण्याच्या मार्गावर वाटचाल करत आहे. जनतेच्या सत्तेचा आधार घेत, सत्ताधारी वर्ग आपल्या संपत्ती, प्रतिष्ठा व सत्ता विस्तारासाठी लोकशाहीचा मुखवटा वापरत आहे. लोकशाहीचा केंद्राभिमुख मानसशास्त्रीय ऱ्हास होत असून, आजची लोकशाही सेंट्रिपिटल गव्हर्नन्स सायकोलॉजी मध्ये अडकली आहे. निर्णयप्रक्रिया, संपत्ती आणि सत्ताकेंद्र एका मर्यादित गटात केंद्रित होत आहे. सत्ताकेंद्राकडे झुकणारी ही लोकशाही आता लोकसहभाग नव्हे, तर सत्तासंरक्षण बनून राहिली आहे. लोकशाहीमधील लोक हे विचारशील नागरिक न राहता, तात्कालिक लाभासाठी स्वार्थी मतदार झाले आहेत. सामाजिक आणि पर्यावरणीय हितासाठी उदासीन राहणारे मतदार बहुसंख्येने लोकमकत्या स्वभावाचे झाले असल्याचे ॲड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.


भारतीय संविधानाने धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि लोकशाही या तीन स्तंभांवर राष्ट्र उभं केलं. परंतु आज ही तत्त्वं सत्तेच्या काळ्या कुपीत ओढली जात आहेत. धर्मराजकारण, जातीय ध्रुवीकरण, बहुसंख्याकवाद, आणि अस्मितांवर राजकारण करून राजकीय सत्तेचा बाजार मांडला जात आहे. धर्माच्या नावावर सन्मान, शौर्य आणि सांस्कृतिक अस्मिता विकली जाते आहे. जी केवळ लोकशाहीचं नव्हे तर जनतेच्या मनाचंही मरण आहे.


लोकशाहीचं रूपांतर लोकमकात्याशाहीत झाले आहे. नागरिक नवसत्तेच्या लाभाकडे बघतो, नवसंविधानाच्या मूल्यांकडे नाही, धर्माच्या नावावर भावनिक गुलाम बनतो, आणि मत हे विचारांवर नव्हे, तर जातधर्मीय भावनांवर दिलं जातं. या सगळ्या प्रक्रियेमुळे ही लोकशाही नसून, लोकमकात्याशाही बनते जिथे सत्ता ही लोकांसाठी नसून, लोक सत्तेसाठी वापरले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


भारताला जर खऱ्या अर्थाने सक्षम करायचे असेल, तर तो केवळ धार्मिक नव्हे, तर चेतनाशील, सर्जनशील आणि शाश्‍वत मूल्यांवर आधारित असायला हवे, अशी भूमिका संघटनेच्या वतीने मांडण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *