मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीची मागणी; वेतन पथक अधीक्षकांचे टॅब सुरु करण्याचे आश्वासन
देयकांसाठी शिक्षण विभागाच्या चालढकलवृत्तीमुळे शिक्षक, शिक्षकेतर आर्थिक संकटात -वैभव सांगळे
नगर (प्रतिनिधी)- शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे थकीत वैद्यकीय व पुरवणी देयके तातडीने मिळावे व मार्च 2025 पूर्वीच्या भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) पावत्या मिळण्याची मागणी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी संघटनेच्या शिष्टमंडळाने वेतन पथक अधीक्षक रामदास म्हस्के यांची भेट घेऊन निवेदन दिले.
याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे सचिव प्राचार्य संभाजी पवार, शिक्षकेतर संघटनेचे पुणे विभागीय सचिव गोवर्धन पांडुळे, शिक्षक नेते वैभव सांगळे, संभाजी बेलोटे, विनोद सोनसळे, भाऊसाहेब भडांगे, गवळी, ए.जी. आचार्य आदी उपस्थित होते. शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी वेतन पथक अधीक्षक म्हस्के यांच्याशी फोनवर सदर प्रश्नासंदर्भात चर्चा करुन प्रश्न सोडविण्याच्या सूचना केल्या. यावेळी म्हस्के यांनी वैद्यकीय बिलांचे टॅब तातडीने सुरू करण्याचे तसेच थकीत बिलासाठी देखील टॅब सुरू करुन देण्याचे आश्वासन दिले.
जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या स्वतःचे तसेच कुटुंबातील सदस्यांचे आजारपणासाठी केलेल्या खर्चाचे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके 15 मार्च 2025 पासून शिक्षण संचालकांच्या आदेशान्वये थांबविण्यात आलेले आहेत. तथापि जून महिना संपत आला असतानाही शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके अदा करण्यात आलेले नाही.
जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाणी निधी ना परतावा आग्रीम रक्कम मिळण्यास विलंब होत आहे. कर्मचारी त्यांच्या मुला-मुलींचे लग्न कार्यासाठी, आजारपणासाठी तसेच पाल्याचे उच्च शिक्षणासाठी अग्रीम रकमेची मागणी करतात. असे असताना अनेकांचे लग्न होऊन गेले तरी संबंधित अग्रीम रक्कम मिळत नाही. अनेक प्रकरणे पडून आहेत, काही प्रकरणे लगेच निकाली काढली जातात. प्रथम आलेल्यांना प्राधान्य देऊन ही प्रकरणे निकाली काढली जाण्याचे निवेदनात म्हंटले आहे.
शिक्षक शिक्षकेतरांना मार्च 2025 पर्यंतचे ऑनलाइन भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या अद्यापि मिळालेल्या नसल्याचे स्पष्ट करुन, थकीत वैद्यकीय व पुरवणी देयके तातडीने मिळावे व मार्च 2025 पूर्वीच्या भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) पावत्या मिळण्याची मागणी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
आजारपणात मोठा आर्थिक खर्च सोसावा लागतो. कॅशलेस उपचाराची सुविधा नसल्याने शिक्षकांना हॉस्पिटलला रोख रक्कम भरुन, या देयकांचे बील जमा करुनही महिनोमहिने निघत नाही. कुटुंबाची जबाबदारी व झालेला खर्चामुळे आर्थिक परिस्थिती ढासळते. भविष्य निर्वाणी निधीची आग्रीम रक्कमही वेळेवर मिळत नसल्याने शिक्षक गरजेच्या वेळी आर्थिक संकटात सापडत असून, संबंधित प्रशासनाने तात्काळ सदरचे प्रश्न सोडवावे. -वैभव सांगळे (शिक्षक नेते)