• Tue. Jul 22nd, 2025

जनशिक्षण संस्थेच्या जिल्ह्यात कार्यरत प्रशिक्षकांची क्षमता बांधणी कार्यशाळा उत्साहात

ByMirror

Jun 12, 2025

युवक-युवतींना व्यावसायिक प्रशिक्षणाबरोबर आर्थिक साक्षरता गरजेची -विकास जाधव

आर्थिक साक्षरता, अद्यावत सेंटर व पोर्टल रजिस्ट्रेशनवर मार्गदर्शन

नगर (प्रतिनिधी)- महिलांसह युवक-युवतींना व्यावसायिक प्रशिक्षणाबरोबर आर्थिक साक्षरता गरजेची आहे. फक्त व्यवसाय करुन चालणार नाही, तर आलेल्या पैश्‍याचे योग्य नियोजन व गुंतवणूक उज्वल भविष्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. महिन्याला मिळणारे उत्पन्न, बचत, व्यवसायात गुंतवणूक आणि त्यातून मिळणारा लाभ यासंदर्भात विकास जाधव यांनी मार्गदर्शन केले.
भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय (नवी दिल्ली) संचलित जनशिक्षण संस्थेच्या जिल्ह्यात विविध सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या प्रशिक्षकांसाठी क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या नगर शहरातील मुख्य कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात आर्थिक साक्षरता या विषयावर जाधव बोलत होते. याप्रसंगी जनशिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार, कार्यक्रम सल्लागार समिती सदस्य कमल पवार, कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद, लेखापाल अनिल तांदळे आदी उपस्थित होते.


पुढे जाधव म्हणाले की, स्किल इंडिया मिशनची सुरुवात 15 जुलै 2015 झाली. देशातील तरुण वर्गाला वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा त्याचा मुख्य उद्देश आहे. देशाची अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण ही योजना कौशल्य विकास उद्योग मंत्रालय यांच्यामार्फत राबवली जात आहे. युवा देश असलेल्या भारताकडे कौशल्याची राजधानी म्हणून जग पाहत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर पैसा कोठेही न गुंतवता सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतविला पाहिजे. सध्या मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणुकीचे प्रकार घडत आहे. पोस्ट खाते, एलआयसी व बँकेच्या विविध योजना, फिक्स डिपॉझिट, एसआयपी, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.


प्रास्ताविकात बाळासाहेब पवार म्हणाले की, जनशिक्षण संस्था सन 2005 पासून संस्थेचे संस्थापक डॉ. राधेश्‍याम गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली युवक व महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देत आहे. 20 वर्षाच्या कार्यकाळात संस्थेने मोठा टप्पा गाठला असून, हजारो युवक-युवती आणि महिलांना त्यांच्या पायावर उभे करुन शून्यातून यशस्वी झालेल्यांच्या यशस्वी गाथा समाजासमोर उभा केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.


या कार्यशाळेचे उद्घाटन राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद यांनी या कार्यशाळेत शिक्षकांचे आणि प्रशिक्षणार्थींचे पोर्टलवर रजिस्ट्रेशन यावर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी अकोले, शेवगाव, देवठाण, श्रीगोंदा, मिरजगाव, राहुरी तसेच नगर शहर परिसरातील 30 प्रशिक्षक यावेळी उपस्थित होते. तसेच संगमनेर येथील वृंदावन ॲग्रीकल्चर महाविद्यालयाचा स्टाफ हजर होता.


कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाने नवीन गाईड लाईन आणली असून, यापुढे फक्त चांगल्या व सर्व सोयीसुविधांचा समावेश असलेल्या सेंटरला मान्यता देण्यात येणार आहे. या कार्यशाळेत आर्थिक नियोजन, पोर्टलला रजिस्ट्रेशन, डिजिटल मार्केटिंग, प्रशिक्षण केंद्रातील सुविधा, सायबर क्राईम पासून घ्यावयाची काळजी, ग्रामीण भागात असणाऱ्या अडचणी यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *