महापालिका व महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात संतापाचा उद्रेक
प्रश्न न सुटल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा भाजयुमो केडगाव अध्यक्ष सुजय मोहिते यांचा इशारा
नगर (प्रतिनिधी)- केडगाव परिसरामध्ये मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या भीषण पाणीटंचाई व वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या गंभीर प्रश्नांकडे प्रशासन व महावितरणचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे जनतेत तीव्र नाराजी आहे. या समस्यांबाबत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे केडगाव अध्यक्ष सुजय अनिल मोहिते यांनी महापालिका आयुक्त व महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे तातडीने प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे.
केडगावमधील पाण्याची भीषण टंचाई उन्हाळ्याच्या काळात विकोपाला गेली होती. नागरिकांना दररोज पाण्यासाठी आजही भटकंती करावी लागत आहे. मोहिते यांनी सांगितले की, पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करून नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा मिळावा, यासाठी महापालिकेने तातडीने पावले उचलावी. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे सामान्य जनतेचा संयम सुटत चालला आहे. जर लवकरच समस्या सोडविण्यात आली नाही, तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याप्रकरणी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मागील दोन ते तीन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे वाऱ्यामुळे झाडे व त्यांच्या फांद्या विद्युत वाहिन्यांवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. मात्र, महावितरणचे कर्मचारी वेळेवर प्रतिसाद देत नसल्याचा आरोप करण्यात आला. विजेचा पुरवठा सुरळीत करण्यास विलंब होत आहे आणि नागरिकांना अंधारात जीवन जगावे लागत आहे.
या दोन्ही गंभीर प्रश्नांकडे महापालिका व महावितरणने त्वरित लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा भाजयुमो अध्यक्ष सुजय मोहिते यांनी दिला आहे.