प्राणघातक हल्ल्याप्रकरणी सराईत गुन्हेगाराचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला -ॲड. देवा थोरवे
नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील हातवळण परिसरात माजी डी.जी.पी. ॲड. रमेश जंजीरे व त्यांचा मुलगा सुशांत रमेश जंजीरे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपी भरत ऊर्फ भवानी पवार याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला आहे. या गंभीर गुन्ह्यात सागर वाळके व शुभम मोकळे हे देखील आरोपी आहे.
दि.2 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी सुमारास बीड जिल्हा न्यायालयातील माजी डी.जी.पी. ॲड. रमेश जंजीरे यांचा मुलगा सुशांत जंजीरे व त्यांच्या कामगार संतोष खिलारे यांच्यावर रुईछत्तीसी मार्गे हातवळण येथे जात असताना वाटेफळ गावाच्या पुलाजवळ तिन्ही आरोपींनी प्राणघातक हल्ला केला. फिर्यादीच्या गाडीसमोर शुभम ऊर्फ बाबू चौधरी याने आपली गाडी लावून अडवली व पाठीमागून आलेल्या इतर आरोपींनी गाडीवर दांडके, रॉडने हल्ला चढवला. संतोष खिलारे यांच्या तोंडावर लोखंडी रॉडने जबर मारहाण करण्यात आली त्यांचे चार दात पडले, तर सुशांत जंजीरे यांना चाकूने भोसकण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यांनी पाठ फिरवल्याने चाकू त्यांच्या डाव्या पार्श्वभागात घुसला.

घटनास्थळी फिर्यादीचे वडील रमेश जंजीरे व चुलत भाऊ मुकेश पोहोचले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. आरोपींनी गाडीत असलेली पैशाची बॅग हिसकावून पलायन केले. या प्रकरणी नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये भा.दं.वि. कलम 307, 327, 324, 336, 314, 504, 427 सह 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी भरत ऊर्फ भवानी पवारला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्याचा रेग्युलर जामीन अर्ज अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात फेटाळण्यात आला.
यानंतर संबंधित सत्र केस क्र. 11/2024 अंतर्गत पुन्हा जामीन अर्ज दाखल करण्यात आला, तोही जिल्हा न्यायालयाने फेटाळला. शेवटी आरोपीने उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज क्र. 408/2025 दाखल केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा दाखला आणि वकीलांनी केलेल्या युक्तिवादामुळे आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. या प्रकरणात फिर्यादी पक्षाकडून सरकारी वकीलांनी युक्तीवाद केला. त्यांना ॲड. देवा थोरवे व ॲड. सुभाष वाघ यांनी सहकार्य केले.