परिसरातील नागरिकांनी उपायुक्तांसमोर वाचला विविध प्रश्नांचा पाढा
ओढ्यात मैल मिश्रित पाणी सोडणाऱ्यांवर दिले कारवाई निर्देश
नगर (प्रतिनिधी)- सिव्हिल हडको परिसरातील ओढ्यामध्ये मैल मिश्रित पाणी सोडल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरुन, नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असताना मनपा उपायुक्त विजयकुमार मुंडे, शहर अभियंता मनोज पारखे यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि.20 फेब्रुवारी) ओढ्यासह सदर परिसराची पाहणी केली. यावेळी परिसरातील नागरिकांनी उपायुक्तांसमोर आरोग्यासह विविध प्रश्नांचा पाढा वाचला.

याप्रसंगी प्रशांत सराईकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद लहामगे, राष्ट्रवादी कामगार सेलचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर, राजेंद्र कचरे, काका शेळके, शिवम देवगुणे, राहुल दरेकर, अक्षय सूर्यवंशी, मोहित गाडे, अमित कचरे, अनंत पालवे, राजेंद्र कांबळे, अशोक मुळे, अशोक कर्डिले, धनराज सोनवणे, अरुण सीतापुरे, गिरीश चोथे, उमेश पाठक आदींसह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मनपा उपायुक्तांसह आलेल्या अधिकाऱ्यांनी सिव्हिल हडको मधील गणेश चौक, गायकवाड कॉलनी, भारत चौक परिसराची पहाणी केली. यावेळी नागरिकांनी रस्ता काँक्रिटीकरण झालेल्या कामाच्या तक्रारी, वेळेवर सफाई न होणे व गणेश चौकातील रस्त्याचे संथ गतीने सुरु असलेल्या कामाची तक्रार केली. उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी संबंधित विभागातील अधिकारी व ठेकेदार यांना तात्काळ नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे सूचना केल्या. तर सिव्हिल हडको परिसरातील ओढ्यामध्ये मैल मिश्रित पाणी कोणालाही सोडता येणार नसल्याचे स्पष्ट करुन, मैल मिश्रित पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे त्यांनी निर्देश दिले.
सावेडी मधील सिव्हिल हडको भारत चौक परिसरात ओढ्यामध्ये काही नागरिकांनी मैल मिश्रित पाणी सोडल्यामुळे परिसरातील सर्वच नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. डेंगूच्या डासांची उत्पत्ती होण्यास कारणीभूत ठरलेल्या या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या घाण पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, सर्वत्र दुर्गंधी देखील पसरल्याने व नळाद्वारे देखील दुषित पाणी येत असल्याने स्थानिक नागरिकांनी दोन दिवसापूर्वी उपायुक्त मुंडे यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. नागरिकांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन मनपा प्रशासनाच्या वतीने उपायुक्तांनी सदर परिसराची संबंधित अधिकाऱ्यांसह पहाणी केली. तातडीने नागरिकांच्या प्रश्नाची दखल घेतल्याबद्दल नागरिकांच्या वतीने मनपा प्रशासनाचे आभार मानण्यात आले.
नागरिकांच्या तक्रारीनंतर उपायुक्त विजयकुमार मुंडे व शहर अभियंता मनोज पारखे यांनी दखल घेऊन सदर प्रश्न सोडविण्यासाठी घेतलेला पुढाकार स्वागतार्ह आहे. सिव्हिल हडको परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असताना, या भागात साथीचे आजार पसरत आहे. यासंबंधी मनपा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. -आनंद लहामगे जिल्हा उपाध्यक्ष, (राष्ट्रवादी)