प्रतिज्ञापत्र नमुना अ नियम 4 प्रमाणे चौकशी अहवाल सादर केला गेला नसल्याचा आरोप
प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन; शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा
नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद शाळेतील दोन शिक्षकांना 2005 नंतर 3 अपत्ये असताना त्यांना बडतर्फ करावे व महाराष्ट्र नागरी सेवा नियम 2005 मधील प्रतिज्ञापत्र नमुना अ नियम 4 प्रमाणे चौकशी अहवाल सादर केलेला नसताना जिल्हास्तरीय समिती गठीत करून विस्तार अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू पवार यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदर प्रकरणी कारवाई न झाल्यास पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
1 जुलै 2005 नुसार प्रतिज्ञापत्र नमुना अ नियम 4 प्रमाणे चौकशी अहवाल गटशिक्षणाधिकारी पारनेर यांनी न करता, जाणीवपूर्वक 14 जानेवारी 2025 रोजीचा दिशाभूल करणारा व त्यांना पाठीशी घालणारा अहवाल विस्तार अधिकारी यांच्यानुसार तो अहवाल तयार करण्यात आला आहे. विस्तार अधिकारी यांनी शासन परिपत्रकानुसार चौकशी अहवाल न बनवता आर्थिक हितसंबंध जोपासून, शासनाची व तक्रारदार यांची दिशाभूल केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जिल्हा शिक्षण विभाग स्तरावरून समिती गठित करून महाराष्ट्र नागरी सेवा नियम 2005 मधील प्रतिज्ञापत्र नमुना अ नियम 4 प्रमाणे कागदपत्रे तपासण्यात यावी. हे प्रतिज्ञापत्र नोकरी लागल्यावर घेतले जाते, परंतु विस्तार अधिकारी यांनी त्या शिक्षकांशी संगनमत करून 14 जानेवारी 2025 चे प्रतिज्ञापत्र घेऊन शासनाची दिशाभूल केली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. 2005 नंतर 3 अपत्ये असलेल्या त्या दोन शिक्षकांना बडतर्फ करावे व त्यांना पाठिशी घालणाऱ्या विस्तार अधिकारी यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.