आदिवासी सेवा प्रतिष्ठानचा उपक्रम; आदिवासी ग्रामस्थांवर मोफत औषधोपचार
अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना मिळाला आरोग्यासाठी आधार
नगर (प्रतिनिधी)- सह्याद्रीच्या चारही बाजूने वेढलेले व निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या फोफसंडी (ता. अकोले) येथील अतिदुर्गम आदीवासी गावात नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर राबविण्यात आले. आदीवासी भागातील नागरिकांना अद्यावत आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीकोनाने आदिवासी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून आदीवासी ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करुन मोफत औषधोपचार करण्यात आले.
जिल्ह्यातील अतिदुर्गम आदीवासी भाग असलेल्या फोफसंडी गावात आजही जंगलात वाडी-वस्तीत तर एक कुटुंब चक्क गुहेत राहत आहे. अशा लोकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचविण्याच्या उद्देशाने आदिवासी सेवा प्रतिष्ठानने पुढाकार घेऊन आरोग्य शिबिर राबविले. या शिबिरास परिसरातील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. याप्रसंगी गावचे सरपंच सुरेश वळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष काशीनाथ गवारी, सचिव महेश शेळके, उपाध्यक्ष नितीन साबळे, हेमंत घोडे, आदिनाथ भांगरे, ॠषी उघडे, जेष्ठ सदस्य नवनाथ बांबेरे, उबाळे, शिवाजी वळे, तान्हाजी वळे आदी उपस्थित होते.
महेश शेळके म्हणाले की, आदिवासी समाज आजही शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित आहे. आरोग्य सुविधा परवडत नसल्याने पारंपारिक पध्दतीने ते औषधोपचार करतात. मात्र गंभीर आजार टाळण्यासाठी वेळोवेळी उपचार व तपासण्यांची गरज आहे. ही जाणीव ठेवून सदर शिबिर राबविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काशीनाथ गवारी म्हणाले की, सकल आदिवासी समाज हा शिक्षण, रोजगार तसेच आरोग्य या मुलभूत सोयी-सुविधांपासून सातत्याने उपेक्षित आणि वंचित राहिला आहे. या सुविधा त्यांच्या दारा पर्यंत घेऊन जाव्या लागणार आहे. त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सरपंच सुरेश वळे यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या कार्याचे कौतुक करुन आभार मानले. शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी तज्ञ डॉक्टरांनी आदिवासी ग्रामस्थांची विविध आरोग्य तपासणी करुन गरजूंना मोफत औषधे दिली. तर निरोगी आरोग्याबद्दल मार्गदर्शन केले. हेमंत घोडे यांनी आभार मानले.