• Wed. Feb 5th, 2025

खासदार निलेश लंके यांनी केली नेहरु मार्केटच्या जागेची पहाणी

ByMirror

Jan 29, 2025

भाजी मंडईसह तीन मजली व्यापारी संकुल बांधण्याच्या आराखड्यात आमची जागा दाखवा?

ओटे धारक भाजी विक्रेते व गाळेधारकांची ओरड; गुरुवारी खासदार घेणार आयुक्तांसह बैठक

नगर (प्रतिनिधी)- शहरातील नेहरु मार्केटच्या जागेची खासदार निलेश लंके यांनी पहाणी केली. तर पूर्वीच्या नेहरु मार्केटमधील ओटे धारक भाजी विक्रेते व गाळेधारक यांच्याशी चर्चा करुन त्यांचे प्रश्‍न जाणून घेतले. यावेळी नेहरु मार्केटच्या ओटे धारक भाजी विक्रेते व गाळेधारकांनी महापालिकेने तयार केलेल्या भाजी मंडईसह तीन मजली व्यापारी संकुल बांधण्याच्या आराखड्यात योग्य जागा मिळण्याची मागणी केली. या संदर्भात खासदार लंके यांनी गुरुवारी (दि.30 जानेवारी) आयुक्तांसह नेहरु मार्केटच्या ओटे धारक भाजी विक्रेते व गाळेधारक यांच्यासह बैठक घेवून त्यावर तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले. याप्रसंगी हातगाडी भाजी विक्रेते संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय झिंजे, युवा सेनेचे विक्रम राठोड, प्रदीप (भैय्या) परदेशी, योगीराज गाडे आदी उपस्थित होते.


महापालिकेच्या वतीने सन 2011 मध्ये नेहरु मार्केट पाडण्यात आले. सन 2017 च्या सुमारास बीओटी तत्त्वावर व्यापारी संकुल व भाजी मंडई उभारण्याचा निर्णय बारगळला. अनेकवेळा मार्केट उभारणीचा निर्णय होवून तो पूर्णत्वास गेलेला नाही. नेहरु मार्केटमधील सर्व ओटे, गाळेधारक हॉकर्स युनियन, हातगाडी भाजी विक्रेते संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलन, उपोषण व महापालिका प्रशासनाशी पाठपुरावा करुन अद्यापि नेहरु मार्केट बांधण्यात आलेले नाही. यामुळे येथील भाजी विक्रेते ओटे धारक रस्त्याच्या कडेला बसून आपला उदरनिर्वाह करीत आहे. महापालिकेने तयार केलेल्या भाजी मंडईसह तीन मजली व्यापारी संकुल बांधण्याच्या निर्णयाचे सर्व सर्व ओटे, गाळेधारक हॉकर्स युनियन, हातगाडी भाजी विक्रेते संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले आलेले आहे. मात्र मनपा प्रशासनाने या आराखड्यात त्यांची जागा दाखवून देण्याची मागणी करण्यात आलेली आहे.


या पार्श्‍वभूमीवर खासदार लंके यांच्याकडे सर्व ओटे, गाळेधारक हॉकर्स युनियन, हातगाडी भाजी विक्रेते संघटनेच्या वतीने प्रश्‍न मांडला असता, त्यांनी सदर जागेची प्रत्यक्ष पहाणी करुन सर्व ओटे भाजी विक्रेते व गाळेधारक यांच्याशी संवाद साधला.


नेहरु मार्केट 13 वर्षांपूर्वी पाडण्यात आले. ते बांधण्यासाठी पुन्हा महापालिकेने हा प्रकल्प बीओटी तत्वावर न देता स्वत: विकसीत करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा आराखडा तयार करताना येथील पूर्वीचे सर्व ओटे व गाळेधारक यांची जागा दाखविण्यात आलेली नाही. याबाबत संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. 72 ओटे धारक व 17 गाळेधारकांचा हा प्रश्‍न आहे. गुरुवारी आयुक्तांसह होणाऱ्या बैठकीत आराखड्यात सर्व ओटे व गाळेधारक यांची प्रत्यक्ष जागा कुठे असणार आहे? याची माहिती घेतली जाणार आहे. अनेक वर्षापासून जागेपासून वंचित केलेल्या या घटकांना योग्य स्थान न मिळाल्यास त्या आराखड्याला तीव्र विरोध केला जाणार आहे. तर वेळप्रसंगी उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा संजय झिंजे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *