3 लाख 80 हजार रुपयाचा दंड आणि दंड न भरल्यास 3 महिने कठोर कारावासाचा आदेश
घेतलेल्या औषधाचे चेक झाले होते बाऊन्स
नगर (प्रतिनिधी)- खरेदी केलेल्या औषधासाठी दिलेले चेक न वटल्या प्रकरणी शहरातील एका डॉक्टराला 3 लाख 80 हजार रुपयाचा दंड आणि दंड न भरल्यास 3 महिने कठोर कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.
फिर्यादी असलेल्या सावेडी येथील लक्ष्मी डिस्स्ट्रीब्युटर्सच्या मालकाकडून डॉ. किशोर नरहरी पाथरकर (रा. कानेटिक चौक) यांनी औषधांची खरेदी केली होती. त्या मालाच्या बाकी रक्कम पोटी साडेतीन लाख रुपयांचा धनादेश फिर्यादी यास दिला होता. फिर्यादी यांनी धनादेश बँकेत जमा केला असता, तो न वाटता परत आल्याने त्यांनी अतिरिक्त न्याय दंडाधिकारी कोर्ट नंबर 15 यांच्या कोर्टात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कलम 138 अन्वये फिर्याद दाखल केलेली होती.
सदर फिर्यादीच्या गुणदोषावर चौकशी होऊन आरोपीस धनादेश न वटल्या प्रकरणी अतिरिक्त न्यायदंडाधिकारी डी.एम. झाटे (कोर्ट नंबर 15) यांनी आरोपी डॉ. पाथरकर यांना दोषी धरून रक्कम 3 लाख 80 हजार रुपयाचा दंड सुनावला आहे. दंड न भरल्यास 3 महिने कठोर कारावासाची शिक्षेचे आदेश दिले आहेत. अपिलाचा कालावधी संपताच सदर रक्कम फिर्यादीस देण्याचा हुकूम करण्यात आलेला आहे. या प्रकरणात फिर्यादी तर्फे ॲड. मनीष पी. गांधी यांनी काम पाहिले.