योग शिक्षकांचा गौरव
प्राणायाम बरोबर आहार आणि विचार महत्त्वाचे -आयुक्त यशवंत डांगे
नगर (प्रतिनिधी)- प्राणायाम बरोबर आहार आणि विचार महत्त्वाचे आहेत. सध्या विचांराचे प्रदूषण झाले आहे. त्याला आवर घातला पाहिजे. महात्मा गांधी यांनी वयाच्या पाचव्या वर्षी राजा हरीशचंद्र नाटक पाहिले आणि त्यांचे जीवन बदलून गेले. आयुष्यभर सत्य, अहिंसेचे पालन केले. स्मार्टफोन व अद्यावत तंत्रज्ञान पेटलेली मशाल असून, चांगल्या लोकांच्या हातात असेल तर ती मार्ग दाखवेल. वाईट लोकांच्या हातात दिली तर जाळून टाकेन, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी केले.

सावेडी येथील शुभ मंगल कार्यालयात आंनद योग केंद्राच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आयुक्त डांगे बोलत होते. आनंद योग केंद्राचा स्थापना दिवस निरोगी व सदृढ आरोग्याचा जागर करीत साजरा करण्यात आला. मागील पाच वर्षापासून आनंद योग केंद्राच्या माध्यमातून योगाचा प्रचार-प्रसार सुरु असून, नागरिकांसाठी योग वर्ग घेऊन समाजात आरोग्याप्रती जागृतीचे कार्य केले जात आहे.
पुढे डांगे म्हणाले की, आपल्या देशाला निसर्गाने भरभरुन दिले आहे. जीवनात पर्यटनाचा आंनद घ्या. भारतासारखी भौगोलिक परिस्थिती जगात फक्त दोन-तीन देशात आहे. आपल्या देशात बर्फाची शिखरे, रखरखीत वाळवंटे, सुंदर समुद्र किनारे निसर्गाने व जाती-धर्माने नटलेली विविधता असल्याचे स्पष्ट करुन आरोग्यासाठी नियमीत योगा करण्याचे त्यांनी आवाहन केले.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाले. केंद्रप्रमुख दिलीप कटारिया यांनी योग व प्राणायामाने निरोगी जीवन जगता येते. योगाभ्यास नियमितपणे केला पाहिजे. समाज निरोगी करण्यासाठी आनंद योग केंद्रात जास्तीत-जास्त योग शिक्षक तयार करण्याचे कार्य सुरु आहे. घराघरात योग पोहचविण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून कार्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रशेखर सप्तर्षी यांनी आनंद योग केंद्राच्या माध्यमातून मागील पाच वर्षात योगाच्या प्रचार-प्रसारासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमात मिलिंद नेवासकर यांनी प्रशांत बिहाणी, दिलीप पवार, उषा पवार, सोनाली जाधववार, प्रतीक्षा गीते, पूजा ठमके, मनीषा जायभाय, स्वाती वाळुंजकर या योग शिक्षकांचा सत्कार केला. राजेंद्र चौधरी, श्रीकांत निबांळकर, सुभाष भंडारी, स्मिता उदास, स्मिता पाटील, निहाल कटारिया यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.