• Wed. Jul 2nd, 2025

नगर-कल्याण रोडच्या विद्या कॉलनीत फुटलेल्या ड्रेनेज लाईनने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

ByMirror

Dec 14, 2024

भाजपचे शहर सचिव दत्ता गाडळकर यांनी केली परिसराची पहाणी

नागरिकांच्या शिष्टमंडळासह उपायुक्तांची भेट घेऊन तात्काळ प्रश्‍न सोडविण्याची मागणी

नगर (प्रतिनिधी)- शहरालगत असलेल्या नगर-कल्याण रोडवरील विद्या कॉलनीत सुरु असलेल्या डी.पी. रस्त्याच्या खोदाई कामामुळे कामामुळे ड्रेनेज लाईन फुटल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरुन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या भागातील दुरावस्थेची भाजपचे शहर सचिव दत्ता गाडळकर यांनी पहाणी करुन, नागरिकांच्या शिष्टमंडळासह उपायुक्त विजयकुमार मुंडे यांना तात्काळ ड्रेनेज लाईन दुरुस्तीचे व बंद असलेले डिपी रोडचे काम सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.


कल्याण रोड येथील विद्या कॉलनीत अनुसयानगर ते सीना नदी डीपी रोडचे काम गेल्या दोन महिन्यापासून बंद स्थितीत आहे. जेसीबीच्या खोदाई कामामुळे सर्व रस्त्याच्या बाजूला रहिवासींचे ड्रेनेज लाईन फुटले आहेत. त्यामुळे सर्व मैलामिश्रीत पाणी रस्त्याच्या कामासाठी करण्यात आलेल्या खड्ड्यात साचून दुर्गंधी पसरली आहे. पाण्यामुळे डासांची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने, थंडी-तापाचे रुग्ण वाढत आहे. तर साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे.


ड्रेनेज लाईन बरोबरच काही ठिकाणी पिण्याची पाईपलाइन देखील फुटली असल्याने नळाद्वारे मैलमिश्रीत पाणी येत आहे. कल्याण रोड भागामध्ये फेज टू चे पाणी सुरु करण्यात आले असून, पाणी कमी दाबाने येत असल्याने नागरिकांच्या पाण्याचा प्रश्‍न देखील बिकट होत चालला आहे. रस्त्याचे काम बंद असल्याने व मोठ्या प्रमाणात ड्रेनेजचे मैलमिश्रीत पाणी घरांसमोर साचले गेल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. मनपा प्रशासनाने तात्काळ या प्रश्‍नाची दखल घेऊन रोगराईचा फैलाव होणार नाही, या दृष्टीकोनाने संबंधित विभागाला सूचना देऊन ड्रेनेजलाईन व पाण्याची लाईनचे काम सुरळीत करुन करुन देण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी आप्पासाहेब सोनवणे, ठकाजी जगधने, चंद्रभान देव्हडे, कुशाबा होडगर, तुषार होडगर, तुकाराम टेकाळे, अशोक चौधरी, सतीश केदार, प्रभाकर शिंदे, विजय कांडेकर, अशोक सावरे, पोपट शिंदे, नामदेव ठुबे, राजू शेळके, संजय शेळके, किरण शेळके, मदन काशीद, रोहिदास कोल्हे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.


–—–
नगर-कल्याण रोडवरील विद्या कॉलनीत आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झालेला आहे. संपूर्ण परिसरात डासाची उत्पत्ती वाढली असून, दुर्गंधी पसरली आहे. तर नळाद्वारे देखील दुषित पाणी येत आहे. तर पाणी कमी दाबाने येत असल्याने नागरिकांच्या पाण्याचा प्रश्‍न देखील बिकट बनला असल्याने महापालिकेने तात्काळ उपाययोजना करुन नागरिकांच्या आरोग्याचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न सोडवावा. मागील दोन महिन्यापासून डिपी रस्त्याचे काम बंद असून, खोदलेल्या रस्त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ठेकेदाराने अनेक ठिकाणी अर्धवट काम केलेले असून, प्रशासनाने तात्काळ ठेकेदाराकडून काम पूर्ण करुन घ्यावे. -दत्ता गाडळकर (शहर सचिव, भाजप)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *