• Tue. Jul 1st, 2025

ज्येष्ठ कवी सखाराम गोरे यांच्या आलाप काव्य संग्रहाचे प्रकाशन

ByMirror

Dec 2, 2024

तरुणांसाठी प्रेम काव्यासह जीवनाला प्रेरणा व स्फूर्ती देणाऱ्या कवितांचा समावेश

जीवनाची वास्तवता, अनुभवता व कल्पकता आलाप या काव्य संग्रहात उतरली -राजन लाखे

नगर (प्रतिनिधी)- संवेदना हृदयात उतरून जेव्हा शब्दरूपी उमटतात, तेव्हा साहित्य, काव्य निर्मिती होते. काव्य साहित्याचा दागिना आहे. काव्यातून मोठा आशय छोट्या शब्दात व्यक्त होतो. विचारावर विचार करायला लावणारा कवी असतो. अनुभव अनुभूती पर्यंत पोहोचते तेंव्हा कलाकृती साकारली जाते. जीवनाची वास्तवता, अनुभवता व कल्पकता आलाप या काव्य संग्रहात उतरली असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य राजन लाखे यांनी केले.


तरुणांसाठी प्रेम काव्यासह त्यांच्या जीवनाला प्रेरणा व स्फूर्ती देणाऱ्या कवितांचा समावेश असलेल्या नगरचे ज्येष्ठ कवी सखाराम गोरे यांच्या आलाप काव्य संग्रहाचे प्रकाशन नुकतेच पार पडले. या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी लाखे बोलत होते. नगर-कल्याण महामार्गावरील जाधव लॉन येथे ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य खासेराव शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमासाठी पुणे विद्यापीठ म.अ.मं. चे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे, मसापचे केंद्रीय सदस्य जयंत येलुलकर, ज्येष्ठ साहित्यिक तथा कवी चंद्रकांत पालवे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, प्रकाशक गणेश भगत, ज्येष्ठ समाजसेवक जालिंदर बोरुडे, छायाचित्रकार शेवंतराव गोरे, माजी कलाशिक्षक हबीब मन्यार, संतोषकुमार गोरे, अशोक जोशी आदी उपस्थित होते.


पुढे लाखे म्हणाले की, कवीची उर्मी, उत्साह आलाप मध्ये दिसून येथे. हा काव्य संग्रह लयाबध्द असून, यामध्ये सर्व शृंगाररस, जीवनमूल्य अंतर्भूत आहेत. कवी वयाची अमृत महोत्सवी साजरी करत असताना अनुभवाची अनुभूती देखील काव्यामधून उमटते. हे काव्य दुसऱ्यांसाठी मार्गदर्शक व स्फुर्ती देणारा ठेवा आहे. सर्वसामान्यांचे प्रतिबिंब या काव्यात आढळत असल्याचे त्यांनी सांगितले. तर साध्या सोप्या भाषेत कवी गोरे यांनी हृदयाला भिडणाऱ्या कविता मांडल्याचे स्पष्ट करुन, या काव्यांचा त्यांनी परामर्श घेतला.


कार्यक्रमाच्या प्रारंभी गायक प्रा. आदेश चव्हाण यांनी कवी सखाराम गोरे लिखीत अभंग, भक्तीगीत, गवळण आदी सुमधुर गीतांचा कार्यक्रम सादर केला. उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली. प्रास्ताविकातगणेश भगत यांनी गणराज प्रकाशनचे हे 186 वे पुस्तक आहे. जुने, नवीन साहित्यिकांचे साहित्य समाजा पर्यंत आणण्याचे कार्य सुरु असल्याची माहिती दिली. तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर व अनेक ज्येष्ठ साहित्यिकांचा गाडा अभ्यास असलेले कवी गोरे यांच्या लेखणीत ती धार उमटत असल्याचे त्यांनी सांगितले.


डॉ. संदीप सांगळे म्हणाले की, ग्रामीण भागातून आलेले कवी गोरे यांच्या कवितातून ग्रामीण भागातील संघर्ष उमटतो. त्यांची लेखनी चैतन्य व बळ देणारी आहे. त्यांनी समाजातील प्रश्‍नांची धग आपाल्या काव्यातून मांडली आहे. काव्य बहरताना परिपक्व अनुभव महत्वाचा असतो. तो अनुभव या काव्यातून दिसतो. समाजातील प्रश्‍न, हरवत चाललेली नाते आदी प्रश्‍नांवर व्यक्त होऊन त्यांनी समाजाला जागे करण्याचे काम केले आहे. लेखनीतील अस्सल ग्रामीण सोनं त्यांच्या काव्यात आहे. पुणे विद्यापीठ अभ्यासक्रमात विविध साहित्य समावेश करण्यासाठी मातीतल्या साहित्यिकांचा शोध घेतला जातो. अभ्यासक्रमात काही नवीन देण्याचा सातत्याने प्रयत्न असताना गोरे यांच्या कविता समोर आल्याशिवाय राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.


जयंत येलुलकर म्हणाले की, कविता लिहिणे व कविता जगणे हे दोन गोष्टी वेगळ्या असल्या, तरी कवी गोरे कविता जगत आहे. संवेदना जपून त्यांनी काव्य केले आहे, ते सर्वांना भावतात. दुःखावर फुंकर मारण्याचे काम कविता करतात. समाजाला सरळ दिशा दाखवणाऱ्या त्यांच्या कविता असल्याचे त्यांनी सांगितले. जालिंदर बोरुडे यांनी उतारवयात उत्तम दर्जाचे साहित्य समाजाला देण्याचे काम गोरे करत असल्याचे सांगितले. उपस्थित नातेवाईकांनी भावना व्यक्त करुन गोरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. चंद्रकांत पालवे यांनी दारिद्य्र व संघर्षमय जीवन जगून कवी गोरे यांनी आपल्या काव्यातून जीवनाचे प्रतिबिंब उमटवले आहे. या ग्रामीण कविता खऱ्या व युवकांना स्फूर्ती देणाऱ्या असल्याचे सांगितले.
उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कवी गोरे व सौ. हिराताई गोरे यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी साहित्य व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना कवी सखाराम गोरे यांनी शिक्षकाने चौथीत नापास केले, बालपणात लेखणीचा छंद वाढत गेला. अवांतर वाचन शाहीर अण्णाभाऊ साठे व अमर शेख यांच्या प्रेरणेने शाहिरी पोवाडे रचले. कवितेचा कंठ फुटला व कविता नसानसात भिनली असून, ते काव्यातून बाहेर पडत असल्याचे स्पष्ट केले. खासेराव शितोळे यांनी कवी गोरे यांच्या कविता मधून जीवनाची अनुभूती मिळते, अंतरमनाची ठाव घेणारी भाषा असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सरला रनशूर यांनी केले. आभार संतोषकुमार गोरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *