दप्तर तपासणीतून दोषींवर गुन्हे दाखल करुन संस्था चालकांचे परवाने रद्द व्हावे
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी; अन्यथा उपोषणाचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील अनेक संस्था चालक व समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांनी संगणमत करून शिष्यवृत्ती योजनेत मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचा आरोप करुन सदर प्रकरणी संपूर्ण दप्तर तपासणी व्हावी व दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याप्रकरणी कारवाई न झाल्यास समाज कल्याण आयुक्त पुणे यांच्या कार्यालयासमोर 15 जुलै रोजी उपोषण करण्याचा इशारा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व पारनेर तालुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील सन 2012-13 ते आज अखेर नगर मधील समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्तांनी जिल्ह्यातील अनेक संस्था चालकांशी संगणमत करून अनेक विद्यार्थी बोगस दाखवून शिष्यवृत्ती योजनेत मोठ्या प्रमाणात अपहार केला आहे. कुठल्याही प्रकारे जातीचे दाखले न घेता फक्त रक्कम ही संस्था चालकांच्या खात्यावर टाकून, ती रक्कम बँकेतून काढून घेऊन संस्थाचालक व समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांनी संगनमताने वाटून घेतल्याचा संघटनेचा आरोप आहे.
या संदर्भात पारदर्शकपणे कोणतीही माहिती जाणीवपूर्वक दिली जात नाही. 2012 ते आजअखेर शिष्यवृत्ती योजनेचे दप्तर तपासण्यात यावे, ज्या संस्थेच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना दिली त्या संस्थेतील विद्यार्थ्यांची यादी तपासण्यात यावी व त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही की ही? याची चौकशी करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आमच्याकडे अनेक विद्यार्थ्यांची यादी असून, त्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसल्याचे जबाब लिहून घेतले आहेत. 2012 ते 13 या वर्षात ऑनलाईनची पद्धत अस्तित्वात नव्हती, तरी कार्यालयाच्या वतीने माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
शिष्यवृत्ती योजनेच्या अपहाराबाबत संचालक अंमलबजावणी संचनालय (दिल्ली) यांना समाज कल्याण आयुक्त (पुणे) यांनी कारवाई करण्याचे आदेश द्यावे, समाज कल्याण आयुक्त (पुणे) यांच्याकडून संपूर्ण दप्तर तपासणी करून अपहार केलेल्या संस्था चालकांवर गुन्हे दाखल करुन त्यांचे परवाने रद्द करावे, विद्यार्थी निहाय जातीचे दाखले तपासण्यात यावे व यामध्ये दोषी असलेले समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांना बडतर्फ करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.