लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्तीच्या प्रसारासाठी लोकभज्ञाक चळवळीचा पुढाकार
भ्रष्ट राज्यकर्त्यांविरोधात सत्य सविनय डिच्चूकावा जारी करण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय संविधान अधिक गतिमान आणि चैतन्यमयी करण्याच्या उद्देशाने लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने कॉ. गोविंद पानसरे यांचा ग्रंथ राष्ट्रीय बीज ग्रंथ म्हणून घोषित करण्यात आला आहे. या ग्रंथाच्या माध्यमातून देशातील तमाम जनतेला अधिक कार्यरत करण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भ्रष्ट नेत्यांचे शुध्दीकरण करुन भाजप बरोबर घेतले. कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार आणि घोटाळे केलेल्यांचे शुद्धीकरण त्यांनी जाहीर केले. प्रधानमंत्री मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी जाहीर सभेत सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 70 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा जाहीर सभेत आरोप केला होता. मात्र सध्या राजकारणात दोन्ही पक्षांची युती झाली. सत्तेसाठी राज्यकर्त्यांनी देशातील संविधानाची एक पोथी केली आहे आणि त्याला लाल फडक्यात बांधून फक्त पूजा चालू ठेवली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याण आणि न्याय याला फार मोठे महत्त्व दिले होते. त्यांच्या सारखा शासक प्रशासक गेल्या हजारो वर्षांमध्ये दुसरा कोणीही झालेला नाही आणि याबाबतचा इतिहास कॉ. गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होता? या ग्रंथामध्ये नमूद केला आहे.
लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केले. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात या देशात कायद्याचे आणि लोक कल्याणाचे राज्य आणण्यासाठी शिवाजी महाराजांसारखा कोणीही आदर्श नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जीरेटोप घातला होता. परंतु मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नखाची देखील सर येऊ शकणार नाही. मोदी यांना सिकंदर सारखे जगतज्जेता व्हायचे आहे. परंतु लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती यांच्या अभावामुळे मोदी यांचे यान भरकटले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ज्या ग्रंथामुळे तमाम मानव जातीचे कल्याण होऊ शकते, असा शिवाजी कोण होता? हा ग्रंथ लिहिला म्हणून कॉ. पानसरे यांची हत्या करण्यात आली. मागच्या आठवड्यात दाभोळकर यांच्या हत्याकांड संदर्भातील खटल्यात मुख्य आरोपी निर्दोष झाला. यातून देशात कायद्याचे राज्य आहे, ही बाब कोणालाही पटणार नाही. या देशात कायद्याची आणि संविधानाचे राज्य राबविण्याची जबाबदारी तमाम जनतेच्या खांद्यावर आहे. प्रत्येक भारतीय हा आपल्या एका बोटावर मतदानाद्वारे चांगले लोकप्रतिनिधीला निवडून देऊन लोकशाही सुरक्षित ठेवू शकतात. त्यासाठी लोकभज्ञाक चळवळीने सत्य सविनय डिच्चूकावा जारी केला आहे. महात्मा गांधी आणि शिवाजी महाराज यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन या संघटनेने भगवान गौतम बुध्दांचा मार्ग स्विकारला असल्याचे म्हंटले आहे.
शिवाजी कोण होता? या ग्रंथातील छत्रपती शिवाजी महाराजांची कार्यपद्धती सध्याच्या राज्यकर्त्यांनी वापरली पाहिजे आणि जे लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती यांपासून दूर राहतील त्यांच्या विरुद्ध भारतातील तमाम जनता डिच्चूकावा वापरल्याशिवाय राहणार नाही. लोकांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचे काम सध्याचे राज्यकर्ते करीत आहे. कौरव राजपुत्रापेक्षा सध्याचे राज्यकर्त्यांचे नीतीधैर्य वाढले असल्याचे ॲड. गवळी यांनी म्हंटले आहे. डिच्चूकावा हा एक कलमी कार्यक्रम संघटने देशव्यापी लागू केला असून, यासाठी ॲड. गवळी, ओम कदम, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.