विविध सामाजिक प्रश्नांवर जागृती
स्त्रीभ्रूण हत्या, भ्रष्टाचार, विद्यार्थी आत्महत्या या संगीतमय नाटिकेने वेधले सर्वांचे लक्ष
अहमदनगर (प्रतिनिधी)- इकरा एज्युकेशन ॲण्ड वेल्फेअर सोसायटी संचलित मुकुंदनगर येथील पी.ए. इनामदार शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून मानवतेचा संदेश देऊन विविध सामाजिक प्रश्नांवर जागृती केली. स्त्रीभ्रूण हत्या, भ्रष्टाचार, विद्यार्थी आत्महत्या या संगीतमय नाटिकेने सर्वांचे लक्ष वेधले.
जीवनात पाणीचे महत्त्व विशद करुन पाणी बचतचा तर म्हातारपणी आई-वडिलांकडे दुर्लक्ष न त्यांची सेवा करण्याचे प्रबोधन करण्यात आले. पारंपारिक लोकगीतांनी उपस्थितांची मने जिंकली. तर टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पालकांनी दाद दिली.

लखनऊ विद्यापिठाचे माजी कुलगुरू सर्जेराव निमसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी निर्मला साठे, नगरसेवक नज्जू पैलवान, नूर पठाण, माजी प्राचार्य सिराज शेख, नगरसेवक आसिफ सुलतान, हमिदभाई टालेवाले संस्थेचे चेअरमन अब्दुल रहिम खोकर, व्हाईस चेअरमन इंजि. इकबाल सय्यद, सचिव विकार अली काझी, खजिनदार डॉ. खालिद सय्यद, प्राचार्य हारुन खान, उपप्राचार्या फरहाना शेख आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रारंभ विद्यार्थ्यांनी कुरान मधील आयत पठण करून केले. हारुन खान यांनी शाळेच्या वार्षिक अहवालात विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या कार्याचा आढावा सादर केला. तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली.
पाहुण्यांचा परिचय मुशिर आलम यांनी करुन दिला. विद्यार्थ्यांनी कला, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेल्या यशाचा आलेख मांडला. कला, क्रीडा, शैक्षणिक व विविध स्पर्धेत नैपुण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

सर्जेराव निमसे म्हणाले की, शिक्षण हा जीवनाचा पाया आहे. समाजाला शिक्षणापासून विकासात्मक दिशा मिळणार आहे. स्पर्धेच्या युगात जग जवळ येत असताना ग्लोबल सिटीजन होण्यासाठी इंग्रजी भाषेबरोबर एक परकीय भाषा अवगत करणे भविष्याच्या दृष्टिकोनाने चांगले ठरणार आहे. दर्जेदार शिक्षण ही काळाची गरज बनली आहे.

चांगला विद्यार्थी होण्यासाठी बौद्धिक जिज्ञासा महत्त्वाची आहे. तर स्पर्धेत टिकण्यासाठी महत्त्वकांक्षी असणे आवश्यक आहे. जो व्यवसाय निवडाल त्यामध्ये प्रामाणिकपणे कष्ट करून व पुरेपूर ज्ञान प्राप्त करून पुढे जाण्याचे स्पष्ट करुन, त्यांनी व्यवसायाबद्दल अभिमान, बौद्धिक जिज्ञासा व महत्वकांक्षा ही यशाची त्रिसूत्री सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमय्या शेख व सरोज नायर यांनी केले. आभार फरीन मिर्जा यांनी मानले.