• Wed. Jul 23rd, 2025

विधाते विद्यालयातील विद्यार्थ्यांनी किल्ले बनवा स्पर्धेतून जिवंत केला शिवकालीन इतिहास

ByMirror

Nov 7, 2023

विद्यालयाच्या प्रांगणात साकारले 18 गड-किल्ले

पर्यावरणपुरक आकाश कंदिल बनवून दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- नव्यापिढीला गड-किल्ल्यांची तर विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या थोर पराक्रमाची माहिती मिळण्यासाठी सारसनगर येथील कै. दामोधर विधाते (मास्तर) विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी किल्ले बनवा स्पर्धा घेण्यात आली. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर घेण्यात आलेल्या किल्ले बनवा स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांनी बनवलेले रायगड, मुरुड जंजिरा, प्रतापगड, सिंधुदुर्ग असे विविध शिवकालीन किल्ल्यांनी मैदान सजले होते. तर मुलांनी साकारलेल्या महाराष्ट्राच्या गड-किल्ल्यांचे वैभव पाहण्यासाठी पालकांसह परिसरातील नागरिकांनी देखील गर्दी केली होती.


सकाळ पासून शाळेच्या मैदानात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांनी विविध किल्ले बनविण्यास सुरुवात केली. माती, दगड, रान, नैसर्गिक रंग यांचा उपयोग करून अतिशय उत्कृष्ट असे शिवकालीन किल्ल यावेळी साकारण्यात आले. 50 विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात 18 किल्ले उभारले. तसेच यावेळी पर्यावरणपुरक आकाश कंदिल बनवा स्पर्धा देखील पार पडली. आकाश कंदील बनविताना विद्यार्थ्यांनी थर्माकोल व प्लास्टिक न वापरता कागद, पुठ्ठा, बांबूच्या काठ्या अशा पर्यावरणपूरक वस्तूंचा उपयोग करून अतिशय आकर्षक आकाशकंदील बनविले.


या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी चायनामेड व प्लास्टिक कचऱ्यापासूनमुक्त दिवाळी साजरी करण्याचा आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. संस्थेचे सरचिटणीस प्रा. शिवाजी विधाते व मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली आकाश कंदील व किल्ले बनवा स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना संस्थेचे सरचिटणीस प्रा. विधाते यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आली.


प्रा. शिवाजी विधाते म्हणाले की, महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा विद्यार्थ्यांना ज्ञात होण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तर प्लास्टिक मुक्तीचा संकल्प करून विद्यार्थ्यांनी कागदापासून आकाश कंदील बनविले असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के यांनी पहिली ते चौथी व पाचवी ते सातवी अशा दोन गटात स्पर्धा पार पडली. फक्त किल्ले बनवून न थांबता त्या किल्ल्याची ऐतिहासिक पार्श्‍वभूमी देखील विद्यार्थ्यांना सांगण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *