नगरच्या मानवसेवा प्रकल्पाने मनोरुग्ण महिलेला आधार व उपचार देऊन सुखरुप पाठवले घरी
अहमदनगर (प्रतिनिधी)- मानसिक संतुलन बिघडल्याने चार वर्षापुर्वीच घर, कुटुंब सोडून अनेक शहरातून फिरत-फिरत अहमदनगर शहरात आलेल्या त्या मनोरुग्ण महिलेला श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संचलित मानवसेवा प्रकल्पाने आधार दिला. मनोरुग्ण महिलेवर उपचारानंतर तिची मानसिक स्थिती सुधारुन महिलेचे नातेवाईक व कुटुंबाशी भेट घडवून आणण्यात मानवसेवा प्रकल्पाला नुकतेच यश आले. कुटुबाने तिचा शोध घेऊन मिसिंग केस दाखल केली होती. सदर महिला मिळाली नसल्याने कदाचित तिचा मृत्यू झाला असेल असं समजून तिचा शोध थांबवला होता. मात्र मानवसेवेची टिम महिलेला घेऊन अमरावती येथील वाकपुर गावात तिच्या घरी पोहचल्याने सर्व कुटुंबीय भारावले. चार वर्षापुर्वी हरवलेली महिला घरी सुखरुप परतल्याने संपुर्ण समाज, नातेवाईक, गावाने एकवटून आनंद साजरा केला.
रस्त्यांवरून फिरणारे निराधार मनोरुग्णांसाठी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ गेली अनेक वर्षे काम करीत आहे. रस्त्याच्या कडेला पडलेली ही माणसं उचलून मानवसेवा प्रकल्पात आणायची, त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक उपचार करायचे, त्यांना बोलतं करून त्यांच्या घरचे, गावचे पत्ते मिळवायचे आणि पुन्हा त्यांना त्यांच्या कुटुंबात नेऊन सोडायचं, असे कार्य या संस्थेच्या वतीने सुरु आहे.
मानसिक संतुलन बिघडल्याने चार वर्षापुर्वीच घर, कुटुंब सोडून चेन्नई, हैद्राबाद, मुंबई येथे फिरत-फिरत तारा (नाव बदलून) ही निराधार मनोरुग्ण महिला अहमदनगर शहरात पोहचली. दररोजच्या वेदना सहन करुन मिळेल ते खाऊन जगत होती. सर्व भान हरवून बसलेल्या या महिलेला वैयक्तिक स्वच्छतेचही भान नव्हतं. या महिलेची अवस्था पाहून पुढील उपचार व पुनर्वसनासाठी अहमदनगर मधील सामाजिक कार्यकर्त्या संध्या मेढे यांनी संस्थेच्या मानवसेवा प्रकल्पाला कळविले. संध्याताई मेढे व अहमदनगर येथील तोफखाना पोलीस स्टेशन यांच्या मदतीने तारा दिला 20 नोव्हेंबर 2020 रोजी मानवसेवा प्रकल्पात दाखल करण्यात आले होते.
तारा या निराधार मानसिक विकलांग मातेला मानवसेवा प्रकल्पात अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत सुविधासह समुपदेशन, आरोग्याच्या सुविधा पुरविण्यात आल्या. मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर आणि डॉ. सुरेश घोलप यांच्या मार्गदर्शनाने उपचार करण्यात आले. संस्थेच्या परिचारिका सुरेखा केदार यांनी संपुर्ण आरोग्याची काळजी घेतली. उपचार पुर्ण होताच तारा या महिलेने तिच्या जीवनातील वेदनादायी प्रसंग आणि कौटुंबिक माहिती संस्थेच्या समुपदेशिका पुजा मुठे यांना सागितली. तारा ही महिला वाकपुर ता. जि. अमरावती येथील पारधी समाजातील असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे गेल्या चार वर्षांपासून हरवलेल्या महिलेची नातेवाईक व कुटुंबाशी भेट घडवून आणण्यात नुकतेच श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पाला यश आले. पती, दोन मुले व एक मुलगी ही व्यक्ती कुटुंबात होते. या महिलेला त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरुप स्वाधीन करण्यात आले. अमरावती येथील बाबुसिंग पवार यांनी ताराला कुटुंबात पोहचण्यासाठी मदत केली. संस्थेचे आधारवड प्रा. अविनाश मुंडके यांनी या महिलेच्या पुनर्वसनासाठी आर्थिक सहाय्य केले. या निराधार महिलेच्या काळजी, संरक्षण, सुरक्षितता आणि पुनर्वसनासाठी संस्थेचे स्वयंसेवक अविनाश पिंपळे, सुशांत गायकवाड, पुजा मुठे, सुरेखा केदार, सरीता गोडे, अंबादास गुंजाळ, सिराज शेख, शुभांगी माने, पल्लवी तुपे, श्रीकांत शिरसाठ, ऋतिक बर्डे, अनिल दुधवडे, प्रसाद माळी, मच्छिंद्र दुधवडे यांनी विशेष परिश्रम घेतले.