महिला शिक्षिकेशी लगट करण्याचा प्रयत्न भोवला
अहमदनगर (प्रतिनिधी)- खांडगाव (ता. पाथर्डी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकाला महिला शिक्षिकेशी लगट करण्याचा प्रयत्न चांगलाच भोवला आहे. एका महिला शिक्षिकेशी अश्लील वर्तन करुन तिचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात त्या प्रभारी मुख्याध्यापका विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी गंभीर दखल घेऊन अखेर त्या प्रभारी मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई केली आहे.
विजय तुळजाराम अकोलकर असे निलंबित झालेल्या प्रभारी मुख्याध्यापकाचे नाव आहे. अकोलकर हे खांडगाव (ता. पाथर्डी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपमुख्याध्यापक म्हणून काम पाहत होते. मुख्याध्यापकाची जागा रिक्त असल्याने त्यांच्याकडे प्रभारी मुख्याध्यापक पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात फिर्यादी महिलेने यापूर्वी देखील त्रास दिले जात असल्याची तक्रार केली होती. तर सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय झरेकर यांनी देखील या प्रकरणी आवाज उठवून संबंधित प्रभारी मुख्याध्यापकावर कारवाईची मागणी केली होती.
मात्र प्रभारी मुख्याध्यापक विजय अकोलकर यांनी त्या महिला शिक्षिकेशी अश्लील वर्तन करुन तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशनला पिडीत शिक्षिकेने 15 ऑक्टोबर रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. सेवा वर्तणूक नियमाचा भंग केल्याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी प्राथमिक शिक्षण विभागाला पत्र काढून त्या प्रभारी मुख्याध्यापकाच्या निलंबनाचे आदेश काढले आहे. तर त्यांची अकोले पंचायत समिती मुख्यालय येथे नेमणूक करण्यात आली आहे. अकोले गटशिक्षणाधिकारी यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
