• Mon. Nov 3rd, 2025

सातव्या वेतन आयोगाच्या थकीत रकमा व सर्व थकीत बिले दिवाळीपूर्वी मिळावे – बाबासाहेब बोडखे

ByMirror

Oct 19, 2023

शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाचे उपशिक्षणाधिकारी  व वेतनपथक अधीक्षकांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक, शिक्षकेतरांची दिवाळी गोड होण्यासाठी सातव्या वेतन आयोगातील थकीत रकमा व सर्व थकीत बिले दिवाळीपूर्वी मिळण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.
शिक्षक परिषदेचे शहरजिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर  व वेतन पथक अधीक्षक रामदास म्हस्के यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले. यावेळी प्रांतसदस्य प्रा. सुनिल सुसरे, नाशिक विभाग प्रमुख शरद दळवी, कार्यवाह प्रा. शिवाजी घाडगे, कोषाध्यक्ष प्रसाद सामलेटी, प्रा. जयंत गायकवाड, पारखे सर, सुदेश छाजलाने, साजिद पठाण, बबन शिंदे आदी उपस्थित होते.


शासनाच्या आदेशानुसार अंशदायी पेन्शन योजनेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगातील फरक रकमेची रोखीने व सन 2005 पूर्वीच्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह खात्यात दरवर्षी एक प्रमाणे पाच टप्प्यात वितरित करावे असे शासनाचे आदेश आहेत. आजपर्यंत तीन ते चार टप्पे जमा होणे आवश्‍यक होते. परंतु आजतागायात फक्त एक किंवा काहींना दुसरा हप्ता देण्यात आलेला आहे. तसेच 2005 पूर्वीचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी यांचा एकच व काहीचा दुसरा हप्ता भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा झालेला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


या व्यतिरिक्त सर्व कर्मचाऱ्यांची देय थकीत रकमा, सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते तसेच थकीत वैद्यकीय बिले व काही सेवानिवृत्त मुख्याध्यापक व शिक्षकेतर बांधवांची रजा रोखीकरणांची सर्व देयके, दिवाळीपूर्वी ऑक्टोबर 2023 च्या नियमित वेतना बरोबर अदा करण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली आहे. वेतन पथक अधीक्षक म्हस्के यांनी थकीत बिले देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. शासनाकडून निधी प्राप्त झाल्यास तात्काळ कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातील. जास्तीत जास्त मार्चच्या शेवट पर्यंत सर्व प्रकारची देयके अदा केली जाणार असल्याचे त्यांनी आश्‍वासन दिले.


वेतनपथक कार्यालयात व माध्यमिक शिक्षण विभागात कमी कर्मचारी असूनसुद्धा शिक्षणाधिकारी अशोक कडूस व वेतनपथक अधिक्षक रामदास म्हस्के यांनी अनेक प्रकरणे मंजूर करून निकाली काढलेली आहेत. त्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. अद्यापपर्यंत काही शिक्षक, शिक्षकेतर बांधवांचे काही बीले व भविष्यनिर्वाह निधीचे काही प्रकरणे शिल्लक आहेत. या संदर्भात शिक्षक वर्ग सातत्याने पाठपुरावा करत आहे. दिवाळीपूर्वी कर्मचार्यांची सर्व प्रकारची थकीत बिले व कार्यालयाकडे सादर केलेली भविष्यनिर्वाह निधीचे सर्व प्रकरणे तत्काळ मंजूर करून अदा केल्यास शिक्षक, शिक्षकेतरांना व सेवानिवृत्त बांधवांना चांगल्या पध्दतीने दिवाळी साजरी करता येणार असल्याची भावना बाबासाहेब बोडखे यांनी व्यक्त केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *