अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील एका महिलेला धमकावून बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या माऊली धायगुडे याची जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. आरोपीने पीडित महिलेच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देवून तिच्यावर बलात्कार केला व त्या बलात्काराचा व्हिडिओ बनविल्याचा आरोप होता.
फेब्रुवारी 2020 मध्ये कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील एका महिलेच्या घरी जाऊन तिच्या मोबाईल मधील फोटो तिला न सांगता आपल्या मोबाईलमध्ये घेतले. तर तिच्या घरी जाऊन आरोपीने पीडीत महिलेला त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यावर महिलेने घाबरून कोणालाही घडलेला प्रकार सांगितला नाही. पीडीतेच्या म्हणण्यानुसार आरोपी तिच्या ओळखीचा नव्हता. त्यानंतर आरोपीने पुन्हा सदर महिलेच्या घरी जाऊन तिला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी धमकी दिली. परंतु पीडीतेने आरोपीला शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. त्यावर आरोपीने पीडीतेच्या लहान मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवून पीडीतेने शारीरिक संबंध न ठेवल्यास मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. अशा प्रकारे आरोपीने पीडीतेचा बलात्कार केला. पीडितेवर बलात्कार करण्याचा व्हिडिओ सुद्धा आरोपीने काढला असल्याचा आरोप पीडित महिलेने केला होता.
त्यानंतर सुद्धा आरोपी पीडीतेला त्रास दिला. अशा आरोपीच्या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस तिला तिच्या घरच्यांनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यावेळेला झालेला सर्व प्रकार पीडितेने तिच्या घरच्यांना सांगितला. त्यानुसार पीडित महिलेने तथाकथित आरोप करून माऊली धायगुडे व इतर आरोपी विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा नोंदविला.
त्यानुसार आरोपीला सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली. सदर गुन्ह्याचा संपूर्ण तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीविरुद्ध दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. या खटल्यामध्ये सरकारी पक्षाने आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध करण्याकामी साक्षीदारांच्या साक्ष नोंदवल्या. त्यानुसार आरोपीतर्फे ॲड. परिमल फळे यांनी साक्षीदारांची उलट तपास घेतले. त्यामध्ये पीडीतेचा घेतलेला उलट तपास महत्त्वाचा ठरला. ॲड. फळे यांनी पीडित महिलेने आरोपीस खोट्या गुन्ह्यात अडकवले असल्याचा बचाव केला. त्या अनुषंगाने ॲड. फळे यांनी साक्षीदारांचे घेतलेले उलटतपास व न्यायालयासमोर केलेला युक्तिवाद व तपासातल्या त्रुटी विशेष सत्र न्यायाधीश श्रीमती एम.एच. मोरे यांनी ग्राह्य धरून आरोपीची निर्दोष मुक्तता केली. सदर खटल्यात ॲड. फळे यांना ॲड. आनंद कुलकर्णी, ॲड. आशिष पोटे, ॲड. अक्षय कुलट यांनी सहाय्य केले.