तथागत बुद्धिस्ट सोसायटीची मागणी
गुन्हा दाखल करुन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (गवई) शहर जिल्हाध्यक्ष तथा आंबेडकरी चळवळीतील सुशांत म्हस्के यांच्यावर जाणीवपूर्वक दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी तथागत बुद्धिस्ट सोसायटीच्या वतीने अध्यक्ष संजय कांबळे व विजीत कुमार ठोंबे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. हा गुन्हा दाखल करुन पुन्हा दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सुशांत म्हस्के हे रिपाईच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेने त्यांचे कार्य सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या हेतूने महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. तर काही दिवसापूर्वी मागासवर्गीय समाजाबद्दल सोशल मीडियावर काही मुली-मुले दोन रुपये किलोचे गहू तांदूळ खाणारे आमच्यापुढे आरक्षणाच्या जीवावर वाघाच्या पुढे कुत्रे नाचत असल्याचे वादग्रस्त कमेंट केल्या होत्या. या प्रवृत्तीला उद्देशून म्हस्के यांनी व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता. त्यामध्ये मराठा समाजा उल्लेख करण्यात आला नव्हता.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, तो त्यांचा अधिकार आहे. परंतु आरक्षण असलेल्या समाजावर वाईट प्रमाणे बोलू नये. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. सुशांत म्हस्के यांनी मराठा समाजाला उद्देशून वाईट बोललेले नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलनामध्ये म्हस्के यांनी देखील सहभाग घेतला आहे. कोणत्याही समाजावर अन्याय झाला तर ते सातत्याने आंदोलन करत असतात. फक्त मागासवर्गीय समाजाबद्दल ज्या लोकांनी वक्तव्य केले त्यांना उद्देशून म्हस्के यांचे व्हिडिओ होते. त्यांनी तो व्हिडिओ देखील डिलीट केला, मात्र म्हस्के यांच्यावरील राग धरून त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, आंम्ही देखील त्यांच्यासोबत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
म्हस्के हे मागासवर्गीय बौद्ध समाजाचे आहेत. त्यांच्यावर जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करून त्यांची चळवळ बंद करण्याचा डाव आहे. या गुन्ह्यामुळे पुन्हा दोन समाजात तेढ निर्माण होण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक गुन्हा दाखल केलेला आहे. म्हस्के हा एका मोठ्या पक्षाचा जबाबदार पदाधिकारी असून, आंबेडकर चळवळीत सक्रिय आहे. त्यांच्यावर जाणीवपूर्वक दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी तथागत बुद्धिस्ट सोसायटीच्या वतीने करण्यात आली आहे.
