प्रणाली आमले हिची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेच्या चास (ता. नगर) येथील श्री नृसिंह विद्यालयाची महिला कुस्तीपटू प्रणाली गोरक्षनाथ आमले हिने 17 वर्षीय वयोगट व 73 किलो वजनगटात विजतेपद पटकाविले. तिची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
नुकतीच जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान येथे पार पडली. प्रणाली आमले हिने या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करुन यश संपादन केले. या यशाबद्दल क्रीडा अधिकारी भाऊराव वीर यांनी आमले हिचा सत्कार केला. यावेळी आशिष आचारी, जिल्हा तालिम संघाचे खजिनदार पै. नाना डोंगरे, संभाजी निकाळजे उपस्थित होते.
नगर तालुका कुस्ती स्पर्धेत मुलींच्या गटामध्ये श्री नृसिंह विद्यालयाने सर्वाधिक विजेतेपदाच्या बळावर जनरल चॅम्पियनशिप चषक देखील पटकाविले होते. नगर तालुका शालेय कुस्ती स्पर्धेत 14 वर्षीय वयोगटात ज्ञानेश्वरी दीपक भांबरकर (58 किलो), भाग्यश्री युवराज कार्ले (50 किलो), संस्कृती ठकाराम कार्ले (54 किलो), ज्ञानेश्वरी संदीप काळे (39 किलो), 17 वर्षीय वयोगटात गायत्री अर्जुन कार्ले (57 किलो), समीक्षा भाऊसाहेब कार्ले (65 किलो), जयश्री संजय जाधव (61 किलो), ऋतुजा प्रदीप गोंडाळ (69 किलो), ईश्वरी इंद्रभान गोंडाळ (49किलो), प्रणाली गोरक्षनाथ आमले (73 किलो) या दहा महिला कुस्तीपटूंनी विजेतेपद पटकाविले.
या गुणवंत खेळाडूंचे संस्थेचे सचिव जी.डी. खानदेशे, विश्वस्त मुकेशदादा मुळे सर्व संस्था पदाधिकारी, चास गावचे सरपंच युवराज कार्ले, उपसरपंच विश्वास गावखरे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कमल घोडके व ग्रामस्थांनी अभिनंदन केले. विभागीय कुस्ती स्पर्धा निमगाव केतकी, इंदापूर (जि. पुणे) येथे होणार आहे.
