महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन पुरोगामी महाराष्ट्राची शांतता भंग करण्याचा भिडे यांचा प्रयत्न -भरत गारूडकर
चुकीचा इतिहास सांगून बहुजन समाजातील युवकांचे माथी भडकवण्याचे काम करत असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- महापुरुषांबद्दल वादग्रस्त व चुकीचे वक्तव्य करुन पुरोगामी महाराष्ट्राची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांच्यावर तातडीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन, त्यांना अटक व्हावी व भविष्यात अशा पध्दतीने त्यांचे बरळणे बंद करण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष भरत गारूडकर यांनी केली आहे.

शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष असलेले संभाजी भिडे वारंवार समाजात द्वेष व अशांतता पसरविण्याच्या उद्देशाने बेताल वक्तव्य करत आहे. नुकतेच त्यांनी महात्मा फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी, साईबाबा, पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याबद्दल वादग्रस्त व चुकीचे वक्तव्य केल्याने समाजात संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रपुरुषांबद्दल कृतज्ञ व्यक्त करण्याऐवजी त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक वक्तव्य केले जात आहे. महाराष्ट्राची शांतता भंग करण्याचे कारस्थान ते करत असल्याचे गारुडकर यांनी स्पष्ट केले आहे.
संभाजी भिडे चुकीचा इतिहास सांगून बहुजन समाजातील युवकांचे माथी भडकवण्याचे काम करत आहे. समाजात दुही निर्माण करुन पुरोगामी महाराष्ट्राला बदनाम करण्याचे त्यांचे षडयंत्र आहे. महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करण्यापूर्वी भिडे यांनी देश व महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान सिद्ध करावे. महापुरुषांबद्दल बेजबाबदारपणे बोलण्याची त्यांची लायकी नसल्याचे गारुडकर यांनी म्हंटले आहे.
यापूर्वी देखील भिडे यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य करुन त्यांना पाठिशी घातले गेल्याने त्यांची महापुरुषांबद्दल अवमानकारक बोलण्याची हिम्मत वाढली आहे. त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने त्याचे धाडस वाढत आहे. शासनाने कठोर पाऊन न उचलल्यास समता परिषदेच्या माध्यमातून त्यांना जशास तसे उत्तर दिले जाणार असल्याची भूमिका गारुडकर यांनी मांडली आहे.