गावातील श्रध्दा ताकटे या युवतीचे एमपीएससी परीक्षेत यश
ग्रामीण भागातील मुली देखील सर्वच क्षेत्रात पुढे -सरपंच कविता वामन
अहमदनगर (प्रतिनिधी)- देवगाव (ता. नगर) मधील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदी जालिंदर वामन व कमल शिंदे यांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे गावातील कु. श्रध्दा ताकटे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या (एमपीएससी) परीक्षेत यश मिळवल्याबद्दल तिचा व नवनिर्वाचित स्वीकृत संचालकांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने सरपंच कविता वामन यांनी केला.
या सत्कार सोहळ्याप्रसंगी सोसायटीचे चेअरमन मच्छिंद्र शिंदे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी वामन, उपाध्यक्ष विजयराव वामन, माजी उपसरपंच पंढरीनाथ वामन, उपसरपंच हरिदास खळे, व्हाईस चेअरमन भाऊसाहेब वामन, सदस्य अर्जून शिंदे, संचालक प्रकाश शिंदे, अध्यक्ष विजय वामन, सदस्य सुभाषराव शिंदे, किसन वामन, युवा नेते भगवान वामन, दिपक शिंदे, रावसाहेब शिंदे, अशोक शिंदे, दिलीप ताकटे, कुंदाबाई लाटे आदींसह गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरपंच कविता वामन म्हणाल्या की, गावाच्या विकासासाठी सोसायटीची भूमिका महत्त्वाची ठरते. सोसायटीच्या माध्यमातून आर्थिक गरज भागवून सर्वसामान्यांना आधार देऊन सक्षम करण्याचे काम केले जात आहे. श्रध्दा ताकटे हिने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होवून गावाचे नाव उंचावून आदर्श निर्माण केला आहे. ग्रामीण भागातील मुली देखील सर्वच क्षेत्रात पुढे असल्याचे त्यांनी सांगितले. तर नूतन स्वीकृत संचालक व एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या युवतीला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विजयराव वामन यांनी गावातील शैक्षणिक गुणवत्ता वाढत असून, स्पर्धा परीक्षेतही विद्यार्थी चमकत आहे. गावाच्या सर्वांगीन विकासासाठी सर्व एकत्र येऊन योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.